पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जैसे थे करार हा जैसे थे नव्हता. त्यात इंग्रजी राजवटीपेक्षा निजामाचे अधिकार वाढलेले होते. हिंदुस्थान सरकारने आपल्या फौजा काढून घेतल्यामुळे निजामाचे राज्य अधिक अनिर्बंध झालेले होते. हा करार झाल्यानंतर हिंदुस्थान सरकार हैदराबाद विरुद्ध लष्करी बळ वापरील हे उघड झालेले होते. किंबहुना जरूर तर भारत लष्कर वापरील हे कळाल्यामुळेच जैसे थे करार झालेला होता. विलिनीकरण सोडा जैसे थे करार होण्यासाठीसुद्धा निजामाला लष्करी बळाची धास्ती वाटायला लागली ही गोष्ट उघड आहे. ही लष्करी बळांची व त्या बळाच्या वापराची भीती निर्माण झाल्यामुळे हैदराबादेत युद्धोन्माद वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले. जगातून हैदराबादला लष्करी साहित्य मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. या वातावरणातच कासीम रझवी यांचे सामर्थ्य क्रमाने वाढत गेले. केवळ सभेत व्याख्याने देण्यासाठी उभा केलेला नेता क्रमाने खरोखरीची शक्ती होऊ लागला. भारताला न विचारता हैदराबादला शस्त्रास्त्रे देण्यात हॉलंड, फ्रान्स व पोर्तुगाल पुढे आले. पोर्तुगालने लष्करी साहित्य पुरवठ्यासाठी गोवा विमानतळही वापरण्यास संमती दिली. ही शस्त्रास्त्रे एक आंतरराष्ट्रीय चोर सिडने कॉटन हैदराबादेत आणत असे. जैसे थे कराराच्या मागे काश्मीर आणि जुनागढ यांची पार्श्वभूमी आणि जैसे थे करारात हैदराबादच्या स्वातंत्र्याचा विकास या बाबी फारशा प्रसिद्ध नाहीत म्हणून येथे त्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

 हैदराबादच्या राजकारणात पोलिटिकल एजंट कन्हैयालाल मुन्शी यांनी जो गोंधळ घातला त्याविषयी मी इतरत्र लिहिलेले आहे म्हणून या ठिकाणी अजून एका न झालेल्या कराराकडे लक्ष वेधायचे ठरविले आहे. यापूर्वी मी याचा उल्लेख केलेला आहेच की हैदराबादच्या शिष्टमंडळाचे नेते जरी इतर कुणी असले तरी या शिष्टमंडळाचे चिटणीस नबाब अलियावर जंग बहादूर हे असत. नबाबसाहेब हे पुढेही भारताच्या राजकीय पेचावर महत्त्वाचे पुरुष राहिले. आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून वारले. नबाब अलियावर जंग बहादूर हे शियापंथीय मुसलमान आणि निजामाच्या अत्यंत विश्वासाला पात्र असलेले अतिशय चतुर मुत्सद्दी गृहस्थ होते. ते शिया नसते तर बहुतेक भारताचे राष्ट्रपती होऊन गेले असते. जुन्या हैदराबाद राज्यात ते गृहखात्याचे चिटणीस होते. निजामाचे घटनात्मक सल्लागार आणि हैदराबाद संस्थानाचेही घटनात्मक सल्लागार तेच असत. अनेकदा हैदराबाद आणि निजामाच्या वतीने रेसिडेंट अगर व्हॉईसरॉय यांच्याशी बोलणी करण्यास निजामाचे व्यक्तिगत दूतही तेच असत. अलियावर जंग यांना तात्पुरत्या वर्ष दीडवर्षाच्या करारावर समाधान नव्हते. त्यांना

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१३१