पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नये, नसता आपण पाकिस्तानशी वाटाघाटी करू, हा सगळा सरळ दडपण आणण्याचा प्रकार होता. ऑगस्टमध्ये दडपण आणण्याच्या मनोवृत्तीत नसणारे निजाम ऑक्टोबर अखेर मात्र दडपणाचे डावपेच खेळू लागले. या बदलाचे कारण आपण समजून घेतले पाहिजे. या बदलाची प्रमुख कारणे दोन आहेत. पहिले कारण असे की जुनागडने पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला होता. १२ सप्टेंबर १९४७ ला नेहरूंनी जुनागडचा प्रश्न सार्वमताने सोडविण्याची भूमिका जाहीर केली होती, पण १३ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने जुनागडचे पाकिस्तानमधील विलिनीकरण मान्य केले. याशिवाय माऊंट बॅटन यांनी जुनागड प्रश्न युनोत न्यावा असा सल्ला दिला. निजामाने यावरून स्वाभाविक गणित मांडले की जर हैदराबादने पाकिस्तानशी वाटाघाटी सुरू केल्या तर हैदराबाद प्रश्न युनोत जाईल आणि हैदराबादच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जर भारत युनोत नेणार असेल तर त्याला हैदराबादची तयारी होती. भारताने हैदराबाद प्रकरणी युनोत जाणे म्हणजे तो प्रश्न आंतरराष्ट्रीय आहे याला कबुली देणे, हे हैदराबादला हवेच होते. म्हणून हैदराबादची मनोवृत्ती दडपणाच्या राजकारणाकडे वळू लागलेली होती.

 दुसरी गोष्ट अशी की पाकिस्तान काश्मिरात हस्तक्षेप करणार याची माहिती हैदराबाद सरकारला २० ऑक्टोबरच्या सुमारास मिळाली, २२ ऑक्टोबरला पाकिस्तानच्या काश्मीर आक्रमणाला आरंभ होतो. या काश्मीर प्रकरणाचा शेवट जर पाकिस्तानच्या ताब्यात काश्मीर जाण्यात झाला तर हैदराबादला अधिक ताठर भूमिका घेता येईल. निदान युद्ध घनघोर चालू राहिले तरी हैदराबादला भारताच्या पासून तातडीचा धोका नाही तेव्हा हा क्षण दडपणाच्या राजकारणास सोयीचा आहे असे हैदराबाद शासनाला वाटलेले दिसते. निजामाच्या दुर्दैवाने त्याचे अंदाज फसले. भारताने काश्मिरात आपले सैन्य रवाना केले, श्रीनगर तर पडले नाहीच पण पाकिस्तानी फौजांची पिछेहाट सुरू झाली. ९ नोव्हेंबर रोजी भारताने फौजा पाठवून जुनागडचा ताबा घेतला. त्यावेळी नेहरूंनी हेही जाहीर केले की, संस्थानिकांचे एकतर्फी निर्णय भारत सरकार मान्य करणार नाही. जुनागडचा प्रश्न ज्या पद्धतीने भारताने सोडविला ते पाहिल्यानंतर हैदराबादला पाकिस्तानशी वाटाघाटी सुरू करण्याची हिंमत झाली नाही. काश्मिरात पाकिस्तानी फौजांची माघार पाहिल्यानंतर हैदराबादला पाकिस्तानचा फारसा उपयोग होणार नाही हेही लक्षात आले म्हणून हैदराबादने भारत सरकारशी पुन्हा वाटाघाटीस सुरुवात केली व करारावर आपण सही करणार नाही असे निजाम म्हणत होते त्या करारावर २९ नोव्हेंबर १९४७ ला निजामाने सही केली.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१३०