पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपले भवितव्य ठरविण्याची मोकळीक देण्यात आलेली होती. संस्थानिकांनी आपले भौगोलिक स्थान पाहून भारतात विलीन व्हायचे की पाकिस्तानात विलीन व्हायचे याचा निर्णय घ्यावा अशी सूचना करण्यात आली होती. पण कायद्यानुसार भौगोलिक स्थान पाहून निर्णय घेण्याची संस्थानिकांच्यावर जबाबदारी नव्हती. भारतात अगर पाकिस्तानात जायला अगर कुठेही न जाता स्वतंत्र व्हायला संस्थानिक मोकळे होते. ही घोषणा जरी झाली तरी आपल्या बाजूने कोणतीही घोषणा करण्याची घाई निझामाने केली नाही. एप्रिल आणि मे महिन्यात संस्थानिकांच्या बरोबर माऊंट बॅटननी पुष्कळ चर्चा केली. पण चर्चेच्यामध्ये हैदराबादच्या प्रतिनिधींनी भारतात अगर पाकिस्तानात सामील होण्याचा मुद्दा गौण मानला. त्यांचा आग्रहाचा मुद्दा असा होता की, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती हे चार जिल्हे निजामाच्या राज्याचा भाग आहेत. ते इंग्रजांच्या ताब्यात असले तरी तिथे अधिसत्ता निजामाची आहे. इंग्रजांनी जाण्यापूर्वी करारानुसार हे चार जिल्हे हैदराबादला परत केले पाहिजेत. प्रत्यक्ष वऱ्हाडामध्ये निजामाने आम्हाला हैदराबाद संस्थानात जाऊ द्या असे म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक गट तयार केलेला होता. या गटाला पंजाबराव देशमुख आणि ब्रिजलाल बियाणी यांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अनुमती होती. व-हाडचे सरदार खापर्डे यांनाही व-हाडचे चार जिल्हे निजामाला परत मिळण्याची मागणी न्याय्य वाटत होती. पैसा पेरून गरजेनुसार लॉबी तयार करण्याची निजामाची शक्ती यावरून लक्षात येईल. निजामाने वऱ्हाडचे जिल्हे का मागू नयेत? काश्मीरचा गिलीगीट हा भाग दीर्घकाळ इंग्रजांच्या ताब्यात होता. अधिसत्ता काश्मीर नरेशाची, ताबा इंग्रजांचा. ही गिलीगीटची परिस्थिती होती. हा गिलीगीट जर काश्मीरला परत करायला इंग्रज तयार असतील तर मग वऱ्हाड निजामाला परत का करू नये? असा हैदराबादच्या मंडळींचा मुद्दा होता. व-हाड परत करण्याच्या प्रश्नावर वीर वामनराव जोशी, द्वारकाप्रसाद मिश्र आणि रविशंकर शुक्ला यांचा कडवा विरोध होता. केंद्रीय नेते तर हा प्रश्न विचारात घेण्याच्या लायकीचासद्धा समजत नव्हते. शेवटी माउंट बॅटनने व-हाड निजामाला देता येणार नाही आणि घनघोर युद्धाशिवाय तो मिळणार नाही हे स्पष्टपणे सांगितले.

 ३ जून १९४७ ला निजामाने अतिशय शांतपणे आपला कुठेच विलीन होण्याचा मनोदय नसून स्वतंत्र राहण्याचा संकल्प आहे याची घोषणा केली. त्याबरोबरच शेजारी मित्रराष्ट्र म्हणून भारताशी अतिशय घनिष्ट आणि मैत्रीचे संबंध जोडण्याची इच्छा प्रदर्शित केली. मला तर कधी कधी असेही वाटते की निजामाने याही वेळी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१२६