पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्राधान्य असे. निर्णायक जागी वसलेल्या, सत्तेची सर्व सूत्रे हाती असलेल्या चाणाक्ष मुत्सद्दयांची एक फळी हैदराबादमध्ये होती. जी कासीम रझवीकडे नेहमीच तुच्छतेने पाहात असे. रझवींच्या खास विश्वासातले म्हणून मानले गेलेले तीन मंत्री यामीन जुबेरी, शैफ महमद आणि लायक अली हे रझवीला बडबड्या आणि मध्यम बुद्धीचा माणूसच समजत. पैकी लायक अली हे पंतप्रधान होते. हिंदू मंडळींत निजाम आ र वा मुद्ददू आयंगार व पिंगल व्यंकट रामारेड्डी यांचा सल्ला घेत. तेही रझवीला तुच्छतेने पाहणारे होते. युरोपियनांच्यापैकी निजामाचे खास सल्लागार सर वाल्टर माक्टन यांचेही रझवीविषयी चांगले मत नव्हते. हैदराबादच्या राजकारणात कासीम रझवीचा उदय निजामाच्या हातातले बाहुले म्हणून झाला. हळूहळू रझवीने आपली शक्ती व वजन निर्माण केले आणि पुरेसा वजनदार नेता झाला हे खरे असले तरी निर्णायक सूत्रे नेहमीच निजामाच्या हाती होती. राजा म्हणून नव्हे तर सर्व घटनांचा खरा सूत्रचालक म्हणून हैदराबादेत जे काही घडले त्याची जबाबदारी निजाम मीर उस्मान अली यांच्यावर प्रामुख्याने टाकली पाहिजे. कासीम रझवी हे त्यामानाने गौण पात्र होते.

 निजामाच्या कंजूषपणाविषयी आणि त्याच्या धर्मवेडाविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. द्रव्यलोभीपणा निजामाजवळ भरपूर होता; पण आवश्यक कामासाठी प्रचंड प्रमाणावर पैसा कसा खर्चावा हेही निजामाला कळत होते. तेव्हा पैसे देऊन माणसे विकत घेण्याच्या कलेत निजाम नुसते निष्णात नव्हते तर काही प्रमाणात उधळपट्टीला मान्यत देणारे होते. हैदराबादचे स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्याची निजामाची महत्त्वाकाक्षा होती. हे स्वप्न त्यांनी जिना अगर मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर पाहिलेले नव्हते. निजामाने अमेरिका, ब्राझील, पोर्तुगाल, ऑस्ट्रोलिया, इंग्लंड, फ्रान्स या देशांत स्वतःसाठी लॉबी तयार केलेली होती. इंग्लंडमध्ये तर या लॉबीत काही काळपर्यंत स्वतः चर्चिलच होते. इंग्लंडच्या पार्लमेन्टमध्ये हैदराबादच्या स्वातंत्र्यावर चर्चिलने समर्थनाची जोरदार भूमिका घेतलेली होती. युनोतसुद्धा हैदराबादचा प्रश्न चर्चेला आला तेव्हा अगदीच नगण्य पाठिंबा हैदराबादला मिळाला नाही. दहाबारा राष्ट्रांनी हैदराबादची बाजू काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे असे मत दिले होते. हा सगळा आंतरराष्ट्रीय पाठिंबा प्रचंड पैसा खर्चल्याशिवाय मिळत नसतो. निजामाच्या कंजूषपणाच्या आख्यायिका आपण तारतम्याने समजून घेतल्या पाहिजेत.

 भारत स्वतंत्र होण्याची घोषणा मार्च १९४७ साली करण्यात आली. या घोषणेनुसार हिंदुस्थानचे भारत व पाकिस्तान असे दोन भाग पाडले होते व संस्थानिकांना

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / १२५