पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काही विस्मृत दुव्यांच्याकडे मी लक्ष वेधायचे ठरविले आहे. इत्तेहादुल मुसलमीन ही धर्मपिसाट संघटना, तिचे सशस्त्र स्वयंसेवकाचे रझाकार नावाचे दल आणि या संघटनेचा स्वतःला मुजाहिदे आजम म्हणजे हुतात्म्यांचा सम्राट समजणारा माथेफिरू नेता कासीम रझवी याच्याविषयी आजवर पुष्कळ बोलले गेलेले आहे. त्यामानाने हैदराबादचे राजे उस्मान अलिखाँ बहादूर यांच्याविषयी फारसे बोलले गेलेले नाही. उस्मान अलिखाँ अफूच्या तारेत मस्त असणारे एक लहरी राजे, अतिशय कंजूष आणि अत्यंत श्रीमंत असे गृहस्थ म्हणून प्रसिद्ध आहेत. ते तितकेच धूर्त आणि पाताळयंत्री राजकीय मुत्सद्दी होते व गरजेनुसार वाटेल तेवढा पैसा खर्चण्याची त्यांची तयारी होती, ही गोष्ट कुणी फारशी लक्षात घेत नाही. हैदराबादच्या राजकारणाच्या नाड्या जवळ जवळ अखेरपर्यंत स्वतः निझामाच्याच हातात होत्या. जानेवारी १९४८ च्या नंतर कासीम रझवी याची शक्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. एखादे पाऊल उचलण्यापूर्वी रझवींशी सल्लामसलत करणे निजामाला आवश्यक झालेले होते. इशाऱ्यावर नाचणाऱ्या बाहुलीपेक्षा कासीम रझवीने कितीतरी महत्त्व मिळविलेले होते. हे सगळे खरे असले तरी मुन्शी सांगतात त्याप्रमाणे शेवटच्या काही महिन्यांत निजाम हा फक्त नामधारी सत्ताप्रमुख आणि कासीम रझवी हे प्रमुख सत्ताकेंद्र अशी वेळ कधी आलेली नव्हती. इत्तेहादुल मुसलमीन ही संघटना जन्माला घालून वाढविणे, रझाकारांचे स्वयंसेवक दल शासनाच्या पाठिंब्यावर उभे करणे हे सर्व उद्योग स्वतः निजामांनी केलेले होते. एखादा नेता जर आपल्याला डोईजड होऊ लागला तर गरज पडेल तर विषप्रयोग करून त्याचा काटा बाजूला कसा करावा हे निजामाला अगदीच अज्ञात नव्हते, मुस्लिम लीगचे पहिले नेते बहादूर यार जंग यांना बाजूला सारणे हे तर निजामाचे कर्तृत्व होतेच पण कासीम रझवीला इत्तेहादुल मुसलमीनचे अध्यक्षही निजामानेच केले होते. हैदराबादेत राजकीय सूत्रचालन करणाऱ्या नेत्यांची दुहेरी फळी निजामानेच उभारली होती.

 धर्मांधता वाढविणे, भावनावेगपूर्ण विद्वेषी वक्तृत्व गाजविणे आणि मुसलमानांची संघटना बलवान करणे या उद्योगांसाठी कनिष्ठ बुद्धीचा बेताल आणि बेछूट असा एक माणूस निजामाला हवा होता. सैय्यद कासीम रझवी यांचे स्थान इतकेच होते. लष्कराचे सरसेनापती जनरल एल.इद्रुस हे सैन्याचे अतिशय माहितगार व निष्णात नेते होते. ते पुरेसे फटकळ आणि स्पष्टवक्तेही होते. एल.इद्रुस हे कासीम रझवीला नेहमीच मूर्ख समजत आले. वाटाघाटीत नेहमीच मोईन नवाज जंग आणि अलियावर जंग यांना

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१२४