पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






१२.
हैदराबादचे विलिनीकरण - पडद्यामागील काही सत्ये

 'राजस' मासिकाचा हैदराबाद अंक काढायचा ज्यावेळी ठरले त्यावेळी मला पाठविलेल्या पत्रात प्रा. परांजपे यांनी एक प्रश्न असा विचारला आहे की, हैदराबादमध्ये जे प्रचंड आंदोलन झाले त्यावर विश्वसनीय अशी फारशी तपशिलवार माहिती एकत्र लिहिलेली, गोळा केलेली आढळत का नाही? या एवढ्या प्रचंड संघर्षावर कितीतरी नाटके, कादंबऱ्या लिहिल्या जायला हव्या होत्या. तशा लिहिल्या का गेलेल्या नाहीत! या प्रश्नाचे नेमके उत्तर देता येणे कठीण आहे. प्रो. ना.सी.फडके यांची ‘सितारा मंजील', भाऊसाहेब माडखोलकरांची 'स्वप्नांतरिता', बोकिलांची 'सैन्य चालले पुढे' ए.बी. जोशींची 'रानभूल' अशा काही कादंबऱ्या हैदराबादच्या संघर्षावर लिहिलेल्या आहेत. यांतली एकही कादंबरी संस्थानी राजकारणाच्या अगर संस्थानी जनजीवनाच्या माहितगारानी लिहिलेली नाही. जे जाणकार आणि माहितगार होते त्यांच्यात कुणी ललित वाङमयाचे चांगले लेखक नव्हते. आपल्याकडे एकूणच राजकीय कादंबरी दुबळी आहे. राजकीय घटना काहीशा जुन्या झाल्याच्या नंतर त्या घटनांच्यावर कला ऐतिहासिक कादंबरी ही सुद्धा आपल्याकडे फार दुबळी आहे. ललित वाङमयाचे नेतृत्व महाराष्ट्राचा जो पुढारलेला भाग करतो तिथे हा प्रश्न विचारण्याजोगा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावर चांगल्या कादंबऱ्या अगर नाटके नाहीत. बेचाळीसचे आंंदोलन, सातारा जिल्ह्यातील पत्री सरकार यांवरही फारसे वाङमय उपलब्ध नाही.

हैदराबादच्या सर्व आंदोलनावर अधिकृत इतिहास म्हणून कुणीतरी लिहायला हवे होते. व्ही.पी.मेनन यांनी संस्थानांच्या विलिनीकरणाचा इतिहास विस्ताराने लिहिलेला

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१२२