पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हैदराबाद स्टेट काँग्रेसमधील जहाल विरुद्ध मवाळ या संघर्षात त्यांनी रस घेऊन पाहिला. पण बी.रामकृष्णराव महत्त्वाकांक्षी लोकांना दूर कसे ठेवावे हे जाणत होते. स्वामीजींच्याविषयी आत्मीयता व आदर आणि राजकारणात त्यांना विरोध हे रामकृष्णरावांचे सूत्र होते. शेवटपर्यंत त्यांनी हा जिव्हाळा टिकवला. सत्तेच्या राजकीय डावपेचात स्वामीजींना फार रस नसल्यामुळे हे सौहार्द कायम टिकणे कठीण नव्हते.

 स्वामीजींविषयी मात्र मुनशींच्या मनातला राग केव्हाही गेला नाही. त्यांनी काँग्रेसमधील स्वामीजींचा गट हा छुपा कम्युनिस्टांचा गट आहे असा प्रचार सतत केला. ह्याबाबतची वस्तुस्थिती नोंदवून ह्या प्रकरणाचा निरोप घेतला पाहिजे. कम्युनिस्ट पक्ष हा दीर्घकाळपर्यंत काँग्रेस अंतर्गत पक्ष म्हणूनच होता. अखिल भारतीय काँग्रेसमधून कम्युनिस्ट पक्षाला १९४२ च्या लढ्याशी विश्वासघात केल्यामुळे काढावे लागले. भारतीय काँग्रेसमधून १९४५ साली कम्युनिस्ट बाहेर पडले. कम्युनिस्ट धार्जिणे म्हणून ज्यांची नेहमी नालस्ती केली जाते त्या नेहरूंनी ह्या निष्कासनात पुढाकार घेतला होता.

 हैदराबाद स्टेट काँग्रेसही ह्याला समांतरच वागत होती. इ.स.१९३८ साली स्टेट काँग्रेस स्थापन झाली तेव्हा कम्युनिस्ट स्टेट काँग्रेसमध्येच होते. पुढे महाराष्ट्र परिषद, कर्नाटक परिषद, आंध्र महासभा या नावाने काँग्रेस कार्यकर्ते काम करू लागले. तिथेही कम्युनिस्टांचे पहिले भांडण तेलगू प्रदेशात झाले आणि कम्युनिस्टांची आंध्र महासभा व कम्युनिस्टेतरांची आंध्र महासभा इ.स. १९४३ ला निराळी झाली. ह्यानंतर तेलगू प्रदेशात काँग्रेस व कम्युनिस्ट पुन्हा कधी एकत्र आले नाहीत. इ.स. १९४५ मध्ये संस्थानी प्रजा परिषदेचे जे उदेपूर अधिवेशन झाले त्यात काँग्रेसच्या संस्थानी विभागातून कम्युनिस्टांना वाहेर काढावे असा निर्णय झाला. या निर्णयाला अनुसरून महाराष्ट्र परिषद व कर्नाटक महासभेतील कम्युनिस्ट वेगळे झाले. ३ जुलैला इ.स. १९४६ ला स्टेट काँग्रेसवरील बंदी उठली व तिन्ही सभा पुन्हा एकत्र आल्या. काँग्रेसमध्ये विलीन झाल्या त्या सुमाराला काँग्रेसमध्ये एकही कम्युनिस्ट नव्हता.

 ऑगस्ट १९४७ ला काँग्रेसचा निजामविरोधी लढा सुरू झाला. त्यावेळी कम्युनिस्ट व काँग्रेस यांत तीव्र मतभेद होते. हे मतभेद इतके तीव्र होते की पुष्कळदा आंध्र प्रदेशात काँग्रेस कार्यकर्त्यांवर रझाकारांच्यासह कम्युनिस्टही हल्ले करीत. कम्युनिस्टांच्या या सर्व उद्योगाचा निषेध काँग्रेसने डिसेंबर १९४७ साली एका स्वतंत्र ठरावाने व

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१२०