पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मला मध्यवर्ती मंत्रिमंडळात जागा मिळावी. सरदारांनी ही भूमिका मान्य केली. मुनशींना १९४८ अखेर मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवे होते. प्रत्यक्षात हे स्थान १९५० अखेर मिळाले. यावरून मुनशींचे कार्य सरदारांना किती पसंत पडले, ह्यावर पुरेसा प्रकाश पडतो. पोलिस अॅक्शन झाल्यानंतर काही दिवसांनी मुनशी दिल्लीला गेले व त्यांनी सरदारांना विचारले, माझ्यावर मंडळीचा इतका राग का म्हणून? सरदार म्हणाले, काही जण तुम्ही निजाम टिकवला म्हणून रुष्ट आहेत. काही जणांना माझ्यावर टीका करायची असते पण हिंमत होत नाही म्हणून तुमच्यावर टीका करून ते समाधान मानतात.

 स्पष्टच सांगायचे तर हा भाग नुसता बनावटच वाटत नाही तर हेतुतः बनावट वाटतो. कारण हैदराबाद संस्थान संपविण्याचे श्रेय स्वतः सरदारांचे आहे. उदारपणे बोलायचे तर नेहरू आणि स्वामीजी व सेना श्रेयात सहभागी आहोतः निजाम टिकविण्याचे श्रेय मेनन-नेहरू-सरदार यांच्या सार्वत्रिक भूमिकेचे आहे. सारेच संस्थानिक टिकविले होते तसा निजाम टिकला, ह्याबाबतची प्रथम चर्चा मेनन व सरदार ह्यांच्यात झाली. त्यांच्या निर्णयाला नेहरूंनी संमती दिली, आणि सरदारांचे प्रतिनिधी समजून टीका झालीच असती तर टंडन, राजेन्द्रबाबू, स.का.पाटील, काका गाडगीळ, द्वारकाप्रसाद मिश्रा, मेनन ह्यांच्यावर झाली असती. मुनशींना सरदारांचे प्रतिनिधी कुणीच मानले नसते. मुनशी हैदरावादचा प्रश्न वाटाघाटींनी सोडविण्यात अपेशी ठरले ह्याबाबत कुणीच त्यांना दोष दिला नाही, दोष देणारही नाही. कारण हैदराबादचा प्रश्न चर्चेने सुटणारा नव्हता, हे सारेच जण मानतात. मुनशींना का दोष दिला जातो ते मुनशीना माहीत होते. ते अर्धवट झाकण्याचा विफल प्रयत्न त्यांनी केला आहे इतकेच.

 प्रबल महत्त्वाकांक्षा हा मुनशींचा स्वभावच होता. त्या महत्त्वाकांक्षेपोटी कुणाचे किती नुकसान होईल याची मुनशींना भीती नव्हती. हे नुकसान जर व्यक्तीचे झाले तर हरकत नसते. कारण राजकारणाची गती वक्रच असते. पण जर व्यक्तीच्या अस्वाभाविक महत्त्वाकांक्षा जनतेचे दीर्घ नुकसान करू लागल्या तर मग त्या व्यक्तीला क्षमा करणे फार कठीण होते. मुनशींना गांधीजींनी सांगितले होते की मार्च ४८ पर्यंत हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. गांधीजींसमोर मार्च का होता हे कुणी सांगितले नाही तरी आपण अनुमान करू शकतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरात काश्मिरात युद्ध चालू होते ते बर्फाच्या वर्षावामुळे नोव्हेंबरअखेर मंदावले होते. मार्च ४८ ला काश्मिरात नव्या

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१०९