पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होण्याचा प्रयत्न करतो (पॅसीव्हली पॅट्रिऑटिक) त्यावेळी नव्या आशा दिसू लागतात. शतकांच्या विषाचा प्रभाव कमी होण्यासाठी योग्य वेळ येईतो वाट पाहणे आपले कर्तव्य आहे. स्वामीजी सांगत, पंडितजींच्या जरतारी भाषेचा आम्ही साधासुधा अर्थ केला. तो अर्थ असा की, हैदराबाद प्रश्न भारताने कसाही सोडविला तरी भारतीय मुसलमान फक्त उदासीन राहतील, अंतर्गत उठाव होणार नाही असे त्यांचे मत आहे. संपूर्ण विलिनीकरण आणि क्रमाक्रमाने लोकशाही किंवा संपूर्ण जबाबदार राज्य पद्धती व सामिलीकरणाच्या प्रश्नावर सार्वमत यापेक्षा निराळा पर्याय मी मान्य करणार नाही.

 गांधीजींनी मात्र हिंसेचा वापर आंदोलनात होत आहे ह्याबाबत स्वामीजींना खुलासा विचारला होता. स्वामीजी म्हणाले, अत्याचारांचा जमेल त्या मार्गाने प्रतिकार करण्याच्या आज्ञा मी दिलेल्या आहेत. स्पष्टपणे शस्त्राचा वापर जमेल तिथे आम्ही करीत आहो. गांधीजी दीर्घकाळ गप्प राहिले आणि म्हणाले, पळून भारतात येण्याच्या भेकडपणापेक्षा हे शौर्य फार चांगले. मी तुमच्या अडचणी जाणतो. ह्या लढ्याचे स्वरूपच असे आहे. एक मुनशी सोडले तर हैदराबादचा लढा पूर्णपणे अहिंसक असला पाहिजे असा आग्रह कुणाचा नव्हता. मुनशींना कुणी सल्ला विचारणार नव्हते. त्यांनी अनाहूत सल्ला दिला तर कुणी ऐकणार नव्हते.

 ज्या वातावरणात मुनशींची एजंट जनरल म्हणून नेमणूक झाली ते इतक्या तपशिलाने सांगण्याचे कारण हे की हैदराबादचा प्रश्न वाटाघाटींनी सुटेल असे गांधी, नेहरू, सरदार कुणालाच वाटत नव्हते. मुनशी हा प्रश्न सोडवतील, सोडवू शकतील, निदान त्यांनी तो प्रयत्न करावा अशी कुणाची अपेक्षाही नव्हती. मुनशींची नेमणूक एक शोभेचा भाग होता. त्यांना कोणतेही अधिकार देण्यात आलेले नव्हते, जनतेच्या मनावर चांगला परिणाम व्हावा. दिसायला बरे दिसावे ह्यापेक्षा या नेमणुकीला फारसा अर्थ नव्हता. स्वतःच्या नेमणुकीचे महत्त्व मुनशी सुचवितात त्याप्रमाणे नव्हते. असण्याचा संभव नव्हता. मुनशी हे मुसलमानांचे नावडते होते हे त्यांचे एक महत्त्व होते. मुनशींनाही काही तरी द्यावे असे सरदारांच्या मनात आले इतकेच.

 मुनशींना आपल्या नेमणुकीचे व्यावहारिक महत्त्व नीट माहीत होते म्हणून मुनशींनी सरदारांना हे सांगितले की, आपण संसदेतील जागा न सोडता हे काम पत्करू. सरदारांनी ही अट मान्य केली. राजकारणातील ध्वनी व सूचनांच्या संदर्भात याचा अर्थ हा होतो की हे एक प्रकारचं मंत्रिपातळीवरील काम आहे. हे संपल्यानंतर

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१०८