पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निजामाबाद जेलच्या सत्याग्रहींच्यावर जेलमध्ये घुसून हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे आरंभापासूनच दुहेरी तयारी करणे भाग होते.

 काँग्रेसचे कार्यकर्ते हिंसेचा वापर करीत ह्याबाबत सरदार काही विचारण्याचा संभव नव्हता. तुम्ही हिंसेचा वापर करता आहा काय हे विचारले की स्वामीजी होकार देणार. मग सरदारांनी काय करावे? तुम्ही योग्य करीत आहा हे तोंडाने बोलण्याची इच्छा नाही. हे वागणे चूक आहे, ताबडतोब हिंसाचार थांबवा असे सांगण्याची तर मुळीच इच्छा नाही. त्यामुळे सरदारांच्या बरोबर चर्चेत हा प्रश्न निघालाच नाही. मुनशींनी आपल्या पुस्तकात असे लिहिले आहे की, स्वामीजींनी सरदारांना अहिंसेचे आश्वासन दिले होते (पृष्ठ १८८). ही उघड चुकीची माहिती आहे. स्वामीजींच्या आत्मवृत्तात त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार आहे. बेचाळीसच्या चळवळीतील हिंसेबाबत भारतीय काँग्रेस जशी नामानिराळी राहू इच्छीत होती, तसा हैदराबादचा प्रकार नव्हता. हैदराबाद स्टेट काँग्रेसने सशस्त्र प्रतिकाराचा कार्यक्रम जाहीर पुरस्कारिलेला होता. त्यावेळचे मध्यप्रांताचे गृहमंत्री द्वारकाप्रसाद मिश्र, कर्नाटक काँग्रेसचे नेते निजलिंगप्पा, आंध्रमधील टी. प्रकाशम् यांनी गरजेनुसार शस्त्रसाहाय्य दिले होते.

 सरदारांनी डिसेंबर १९४७ च्या बोलण्यात सरळच तीन बाबी स्वामीजींना स्पष्टपणे सांगितलेल्या होत्या. पहिली म्हणजे चळवळ नेटाने चालू राहिली पाहिजे. दुसरी म्हणजे स्वामीजींनी शांतपणे जेलमध्ये थांबावे. हैदराबाद शासनाशी कोणतीही चर्चा, तडजोड करू नये. आम्ही काय चर्चा करतो आहो याचा विचार करू नये. शक्य तितक्या लवकर हैदराबादमध्ये परत जाणे व अटक करून घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. तिसरी बाब म्हणजे हैदराबादचा प्रश्न माऊंट बॅटन इंग्लंडला परतल्यानंतर पहिली संधी साधून सोडविला जाईल. प्रश्न सोडविण्याची जबाबदारी माझी. म्हणजे सरदारांची. सरदार नुकतेच जुनागढला भेट देऊन आले होते व जुनागढला जाहीर सभेत स्पष्टपणे ते म्हणाले होते की, योग्य प्रकारे न वागल्यास हैदराबादचे भवितव्य जुनागढप्रमाणे होईल.

 नेहरूंनीही हिंसेचा प्रश्न उपस्थित केला नाही. त्यांच्या बोलण्यात सरदारांचेच मुद्दे निराळ्या भाषेत होते. एक मुद्दा थोडा गंमतीदार होता. नेहरू म्हणाले, भारतीय मुसलमानांनी काश्मीर व जुनागढ संघर्षाच्या वेळी आपल्या देशभक्तीचा बराच उचित (फेअरली डिझायरेबल) पुरावा दिला. ज्या दिवशी मुस्लिम समाज उदासीनपणे देशभक्त

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१०७