पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वामीजींनी सर्वांना निर्णायक लढ्याचे आश्वासन जनतेच्या वतीने देऊन टाकले होते. हा लढा जैसे थे कराराच्या वेळीही चालूच होता. सुमारे वीस हजार सत्याग्रही तुरुंंगात होते. जैसे थे करार होताच स्वामीजी व काही कार्यकर्ते यांची सुटका झाली इतकेच.

 ह्या पार्श्वभूमीवर कन्हैय्यालाल मुनशी यांना एजंट जनरल म्हणून हैदराबादला जाण्याची सूचना सरदारांनी केली. मुनशींनी आपल्या 'The End of An Era' या पुस्तकात हा दिवस २० डिसेंबर १९४७ असल्याचे नोंदविले आहे. स्वामीजी तुरुंगातून सुटताच मद्रासला व तेथून दिल्लीला गेले. जुलै ४७ च्या मानाने डिसेंबर ४७ चे वातावरण पूर्णपणे बदललेले होते. फाळणीमुळे ज्या प्रचंड दंगली आगेमागे उसळलेल्या होत्या त्या संपत आल्या होत्या. मध्यवर्ती सरकार स्थिरावलेले होते. केंद्रीय नेत्यांचा आत्मविश्वास वाढलेला होता. जे टाळण्याचा नेहरूंनी सतत प्रयत्न केला ते टळणे शक्य नव्हते हे नेहरूंना आता पटलेले होते. फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान हे शेजारी राष्ट्र म्हणून क्रमाने शांततेने नांदण्यास आरंभ करील. स्वतःच्या जनतेच्या जीवनाचे प्रश्न त्यांच्या समोरही आहेत. हे प्रश्न पाकिस्तानच्या द्वेषाधिष्ठित राजकारणाला विधायक वळण लावतील अशी अंधूक आशा नेहरूंना होती, ती संपली होती. ऑक्टोबर अखेर काश्मिरात फौजा पाठवाव्या लागल्या होत्या. काश्मीरचा अनुभव आनंदाने हुरळण्याजोगा नसला तरी मनोधैर्य वाढविणारा आणि आश्वासक होता. जुनागढ फौजा पाठवून ताब्यात घेतलेच होते. म्हणून गरजच पडली तर हैदराबादचेही भवितव्य तेच होईल असा विचार करण्याच्या मनःस्थितीत केंद्रीय नेते होते.

 गांधीजी, नेहरू व सरदार या तिघांनाही स्वामीजी भेटले, तिघांशीही तपशिलाने बोलले. जैसे थे कराराकडे लक्ष न देता हैदराबाद पूर्णपणे विलीन होईपावेतो लढा नेटाने चालवावा यावर तिघांचेही एकमत होते. स्वामीजींच्यासाठी तर हा निर्णायक लढा होता, ज्यात तडजोड शक्य नव्हती. हैदराबादचा लढा पूर्णपणे अहिंसक कधी नव्हताच. कोणताही कायदा न पाळणारे शासन आणि अत्याचाराचा क्रम सतत अभिमानाने चालविणारा पिसाट मुस्लिम आक्रमक जातीयवाद ह्याविरुद्ध लढणे भागच होते, जिथे सत्याग्रह करण्यासाठी जाणाऱ्या लोकांच्यावर सत्याग्रह करण्यापूर्वीच, केवळ चिखलातून दोन मैल कुणी जावे असा विचार करून पोलिस एकाएकी गोळीबार करीत तिथे केवळ कायदयाच्या कक्षेत कसे राहता येणार? (ही घटना डोरले, तालुका हदगाव, जिल्हा नांदेडची आहे.) बरे सत्याग्रही जेलमध्ये सुरक्षित राहतील ह्याचीही हमी नव्हता.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१०६