Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ ही रामाची अयोध्या ! सर्फराजखां कलकत्त्याहून कधीं एखाया महिन्याला पन्नास हजारांची तर एखाद्या महिन्याला साठ सत्तर हजारांवी इंग्रजी दारू आणवित होता व युक्तिप्रयुक्तीनें बादशहाचा खजिना कोरडा करित होता. या वेळीं नबाब मत-मुद्-उल्-दौला हा नासिरुद्दीनाचा मुख्य प्रधान असून अयोध्येच्या दिवाणगिरीवर राजा रामदयाळ सिंह हा होता. गुदस्त साली अयोध्येच्या दुर्बल प्रजेवर घोर अत्याचार करून या दोघांनी जो महसूल वसूल केला होता, तो सर्व खलास होऊन अयोध्येचा खजिना सांप्रत कोरडा ठणठगीत होऊन पडला. अधिकाऱ्यांच्या या भयंकर छळास कंटाळून अनेक परगण्यांतील प्रजा घरादारांचा त्याग करून नेपाळांत पळून गेली. हजारों शेतकरी आपली पिढीजाद शेतकीची कामें सोडून देऊन ठग, पुंड, दरवडेखोर यांच्या टोळींत सामील झाले व साया अयोध्येत चोर, लुटारू, ठग, पुंड इत्यादि लोकांची बंडाळी सुरू झाली. वर्ष बहुतेक खलास झालें फाल्गुनाचा महिना चालू होता. दुकानदार, कंत्राटदार आपापल्या हिशोबाच्या वह्या बगलेत मारून दिवाण राजा रामदयाल सिंह ह्याच्या कचेरींत येरझारा करूं लागले. एकेकाचा हिशेव तपासून दिवाणसाहेब त्यांनां मुख्य प्रधानाकडे पाठवूं लागले. प्रधान साहेब मोठ्या फिकिरींत पडले. हुजुरांनी मागविलेल्या वस्तु पुरविणारांची बाकी वर्षाचे शेवटीसुद्धां चुकती केली नाही. तर त्याबद्दल हुजुरांच्या कानावर कागाळी गेल्याशिवाय रहाणार नाही; परंतु त्यांना पैसा द्यावयाचा कुठून ? खजिन्यांत तर कवडीहि शिल्लक नाहीं! शिवाय, हुजुरांचा दररोजचा लाखो रुपयांचा खर्च चालूच आहे ! ह्या खर्चाची व्यवस्था न झाल्यास हुजुरांची आपल्यावर इतराजी होऊन खात्रीने आपल्यास पदच्युत व्हावें लागेल ! आतां करावें तरी काय ? प्रजेवर जो भयंकर अत्याचार चालू होता व साय राज्याची जी राखरांगोळी होत होती तिकडे मुख्य प्रधानाचे किंवा दिवाण साहेबांचें यत्किंचितदि लक्ष्य नव्हतें. आपापली नोकरी कशी शाबूत राहील, व आपल्या पोळीवर तूप कसें ओढतां येईल या स्वार्थाच्या विचारानेंच राज्यांतील लहानमोठ्या अधिकाऱ्यांस चिंताव्याकुल करून सोडलें होतें. स्वार्थपरायण होऊन आपापल्या नोकरीच्या शाश्वतीसाठी प्रत्येक लहान मोठा अधिकारी रयतेच्या सुखदुःखांची तिळभरहि पर्वा न करितां अनन्वित कृत्यें करून खजिन्याची भरती करित होता. तथापि निश्चित मनानें कोणालाच झोप येत नव्हती. हुजुरांची मर्जी केव्हां खप्प होईल व आपण कधीं नोकरीस मुकूं ही भीति प्रत्येकाच्या सदैव डोळ्यांपुढे असे.