Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्राक्कथन. राजाचें रयतेच्या कल्याणाकडे, सुखदुःखांकडे आणि न्यायनीतिकडे लक्ष्य पोहोचणे असंभवनीय आहे. नासिरुद्दीनाच्या कारकिर्दीत हजारों कुलस्त्रिया भ्रष्ट झाल्या होत्या, हजारों पतिव्रता राज्याला शाप देत होत्या, व जिकडेतिकडे सैतानपुरी माजली होती. आपली अब्रु कर्धी भ्रष्ट होईल, जीवत, मालमत्ता कधीं नष्ट होईल याची कोणालाच शाश्वती नव्हती. अयोध्येत अमुक एक गोष्ट घडणें ह्मणजे अशक्य आहे, असें यावेळी कोणालाच वाटत नव्हतें. बेचंदनगरी आणि झोटिंगपादशाहीचे साम्राज्य सर्वत्र पसरलें होतें. नासिरुद्दीनास प्रासणाऱ्या नीच ग्रहांत रोशन-उद्-दौला हा प्रमुख होता. या काळसर्पानें नासिरुद्दीनाची आई बादशहा बेगम हिनें नासिरुद्दीनाला विषप्रयोग करण्याची गुप्त मसलत केली आहे असे नबाबाच्या मनांत भरविलें व मायलेकरांत भयंकर कलहानि पेटवून दिला. आपल्याला विषप्रयोग होईल, याची नासिरुद्दीनाला पुढे पुढे इतकी भीति वाटू लागली की, त्यानें जेवण्याखाण्याचे साफ वर्ज्य केलें व आपल्या एका अत्यंत विश्वासू हुजन्यामार्फत बाजारांतून गुप्तपणे चणेफुटाणे आणवून त्याच्यावर तो जीव जगवू लागला. पण असे अन्नपाण्याशिवाय किती दिवस काढणार? त्याची प्रकृति अगदीं बिघडून गेली, हातापायांस सूज आली व अन्नावर त्याची फारच वांच्छा गेली. निरुपाय होऊन एके दिवशीं त्यानें आपल्या अत्यंत प्रीतींतल्या आणि विश्वासू बेगमेच्या महालांतून जेवण तयार करवून आणविलं. तो जेवून उठतो, तोंच त्याला सारखे जुलाब होऊं लागले व तो घायाळ पडला. तृषेनें त्याचा जीव फारच व्याकुळ झाला, तेव्हां त्यानें प्यावयासाठी थोडे पाणी मागितले. यावेळी त्याची प्यारी विलासदासी धनिया मेहरी ही त्याच्याजवळ होती. तिनें कलिंगडाचें पाणी त्याला पाजलें. तत्क्षणी त्याचें प्राणोत्क्रमण झालें. त्या पाण्यांत विष होतें, असा जनापवाद आहे. खुद्द नबाबाची जेथें ही स्थिति, तेथें बिचाऱ्या दुर्बळ रयतेच्या हालांस काय विचारावें ! त्यांची नुस्ती कल्पनाच केली पाहिजे ! पण कल्पना तरी कां चला, आपण अयोध्येत जाऊन तो प्रकार प्रत्यक्ष पाहूं !