पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



८४

रीतीने झरे वाहाण्यास उच्च उच्च प्रदेशामध्ये पाण्याचा संचय असला पाहिजे. पाण्याचा पुरवठा पावसापासून होतो. म्हणून उंच प्रदेशावर पडलेले पावसाचे पाणी वाहून न जाऊ देतां, जितकें मुरून जाईल तितकें मुरविण्याकरितां अवश्य उपाय योजिले पाहिजेत.

झाडांच्या क्रिया.

 आतां, हा हेतु झाडे लाविल्यापासून कसा सिद्धीस जातो हें पाहूं. पर्वतावर, डोंगरावर, किंवा उंच जमिनीवर पावसाचे पाणी पडले असतां मुरून न जातां वाहून जाते. ह्याचे कारण इतकेच कीं, डोंगर सच्छिद्र नसला व त्यावर माती नसली म्हणजे त्यांचा पृष्ठभाग जलशोषक होत नाहीं; व जमीन खडकाळ असल्यामुळे तिजवर जे पाणी पडते ते सर्व सोसाट्याने वाहून खाली येते, व समुद्रास जाऊन मिळते. ह्याशिवाय, खडकामध्ये जरी कांहीं काही आंगच्या फटी किंवा छिद्रे असली, तरी वर पडलेल्या पाण्यास काहीं अटकाव न झाल्यामुळे ते इतके लौकर वाहून जाते की, वरील फटींमध्ये व छिद्रांमध्ये मुरण्यास त्यास अवधि सांपडत नाहीं; व जरी मुरले, तरी फारच थोडे मुरते. ह्याकरितां, डोंगरावर पडलेले पाणी तेथल्या तेथेच मुरून जाण्यास तो डोंगर छिद्रे, फटी ह्यांनीं जितका अधिक पोकळ झाला असेल तितका चांगला. शिवाय, डोंगरावर जलशोषणास माती असली पाहिजे; व एकदम पाणी वाहून न जावे, म्हणून त्याचे प्रवाहास अटकाव करण्यास कांहींतरी साधन पाहिजे. ही सर्व कार्ये त्या डोंगरावर झाडे लाविल्यापासून घडून येतात.