पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/91

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७८

हत्त्वाचे कारण आहे. पाऊस पडण्यास, हवेतील उष्णता कमी करणे आणि हवेत बाष्पोत्पत्ति करणे ह्या ज्या अत्यवश्यक गोष्टी त्या झाडांच्या योगानें अंशतः तरी कशा साध्य होतात, हे वर सांगितलेच आहे. म्हणून पाऊस पडण्यास अनेक कारणे आहेत त्यांपैकी झाडे हे एक महत्त्वाचे कारण समजले पाहिजे. सूर्याचे डागाची कल्पनाही वादग्रस्तच आहे. कारण, ती खरी असती, तर हिंदुस्तानामध्यें अवर्षण पडते त्या वेळी सर्व पृथ्वीवर पाऊस कमी पडावा; परंतु, तसे होत नाही. तथापि, हे डागाचे कारण खरे आहे, असे जरी एक वेळ गृहीत धरून चाललो तरीसुद्धा ही कल्पना झाडांचा व पावसाचा जो संबंध वर दाखविला आहे त्याच्या आड येते असे नाहीं. म्हणण्याचा भाग इतकाच कीं, जी कमी- जास्ती वाफ प्रतिवर्षी समुद्रांतून आपल्या देशावर येते, तीपैकीं होईल तितकी वाफ पर्जन्यरूपाने जमिनीवर आली पाहिजे. सृष्टिनियमानुसार इतर कारणे आपआपला व्यापार करीत आहेतच. ह्यांमध्येच झाडेही पाऊस पाडण्यास कांहीं अंशीं तरी कारणीभूत होतात, हे निर्विवाद आहे.*

--------------------


-----

 *दिवसानुदिवस पाऊस कमी होत चालला आहे, म्हणून जे आमच्या जुन्या लोकांचे म्हणणे आहे ते जंगलनाशाचे कार्य असावे.