पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



७७

वगैरे देशांत प्रयोगाने ही गोष्ट दृष्टोत्पत्तीस आली आहे. विरुद्ध पक्षाचेही बरेच लोक आहेत. जंगलाचा व पावसाचा संबंध काय आहे, याजबद्दल वर शास्त्रीय नियमानुसार प्रतिपादन केले आहे. ह्याकरिता त्या प्रतिपादनावर कोणास आक्षेप काढितां येईल असे वाटत नाहीं, यावर विरुद्धपक्षीयांचा एक मोठा आक्षेप हा आहे की, जंगलाचे योगाने जर पावसाचे मान वाढत असेल तर एक वर्षी कमी व एक वर्षी जास्त असा पाऊस पडू नये. जंगलाचा उत्तरोत्तर ऱ्हास होत चालला आहे अशी जरी कल्पना केली, तरी उत्तरोत्तर पाऊस कमी कमी होत जावा; पण तस होत नाहीं. कधी कधी विपुल पाऊस पडतो, व कधी कधी तर अवर्षणच पडते. म्हणून जंगलाचा व पावसाचा कांहीं संबंध नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आणि ह्याकरितां ते ह्या देशामध्ये नियमित पाऊस न पडण्याची कारणे इतर ठिकाणीं शोधीत आहेत. काही जण सूर्याचे पृष्ठभागावर जे डाग आहेत त्या योगाने पावसाचें मान कमीजास्त होते असे प्रतिपादन कारतात. त्यांचे म्हणणे असे आहे की, ज्या वर्षी सूर्याचे डाग फार कमी असतात त्या वर्षी सूर्यापासून पृथ्वीवर जास्त उष्णता प्राप्त होते. जास्त उष्णतेच्या योगानें बाष्पोत्पात जास्त होते व त्यामुळे पाऊसही जास्त पडतो. ज्या वर्षी डाग फार असतात त्या वर्षी उष्णता कमी असते, आणि त्यामुळे वाफ कमी उत्पन्न होऊन पाऊसही कमी पडतो. ह्या सर्वांस उत्तर हेच की, जंगलामुळेच पाऊस पडतो असे बिलकूल म्हणणें नाहीं. पाऊस पडण्यास दुसरी अनेक कारणे आहेत, त्यांपैकींच झाडे हें एक म-