पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/88

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७५

तर बोलूनचालून अवर्षणच. परंतु, ज्या प्रांतांमध्ये अनावृष्टि आहे तेथेही दुष्काळ पडण्याची सुदैवाने भीति नाहीं; कारण, जमीन कालव्याचे पाण्यावर अवलंबून असते, पावसाचे पाण्यावर बिलकूल अवलंबून नसते म्हणून वर सांगितलेंच आहे. ह्याकारतां तेथील काळजी वाहणें नलगे. नेहमीं दुष्काळ पडण्याचे स्थान म्हटले म्हणजे अल्पवृष्टीचा प्रदेश होय. हिंदुस्तानांत बहुतेक पडलेले दुष्काळ एथेचे पडले आहेत. म्हणून विशेषेकरून ह्याच प्रांतांत पावसाचे मान होता होईल तितके जास्त वाढविण्याचा प्रयत्न करणे अवश्य आहे. व हा हेतु झाडे लावून बऱ्याच अंशीं साधतां येण्यासारखा आहे, हें पुनः सांगावयास नको.

 वर सांगितलेले अल्पवृष्टीचे जे दोन प्रदेश त्यांपैकी दक्षिणेस जो आहे त्याबद्दल विशेष विचार केला पाहिजे. कारण, ह्या प्रदेशाशी आपला निकट संबंध आहे हे एक, व दुसरे महत्त्वाचे कारण हें कीं, उत्तर हिंदुस्तानामध्ये जो अल्पवृष्टीचा प्रदेश आहे तो अनावृष्टि व अधिक वृष्टि ह्यांच्या दरम्यान आहे. म्हणजे अधिक वृष्टीच्या प्रदेशांतून जो पाऊस पडत पडत येतो, त्या योगाने कमी कमी हात पुढे अल्पवृष्टि होते व त्याच्यापुढे अनावृष्टि होते. म्हणजे इकडे समुद्राचे वाफेचा जो पुरवठा असतो, तोच नाहींसा होत जातो, म्हणून अल्पवृष्टि होते. ह्या ठिकाणी पुष्कळ पाऊस पडेल असे करण्यास अगोदर बंगालचे उपसागरांतून जो वाफेचा पुरवठा होतो, तो वाढविला पाहिजे. परंतु, ती गोष्ट असाध्य आहे. म्हणून ह्या प्रांतामध्ये फक्त पावसाचेच संबंधाने