पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



६५

शय थंड असल्या कारणाने साहेब लोक उन्हाळ्यामध्ये तेथे येऊन राहतात. वरील दोन्ही जागा सह्याद्रीची शिखरे असल्यामुळे समुद्राचे पृष्ठभागापासून बऱ्याच उंचीवर आहेत; म्हणून तेथे थंडी अधिक असते. फार कशाला, एकाद्या बऱ्याच उंच डोंगरावर आपण चढलों असतां, वर किती थंडगार वारा लागतो ! ह्याचेही कारण वरीलच होय. बेळगांव जिल्ह्यामध्ये बेळगांव शहरची हवा गोकाकपेक्षां पुष्कळ थंड आहे; कारण, गोकाकपक्षां बेळगांव पुष्कळ उंच आहे. ह्यावरून, उंच उंच गेले असतां थंडी अधिक अधिक असते, हे स्पष्ट झाले. किती उंच गेले असतां किती थंडी जास्त असते, ह्यास प्रमाण असे आहे की, समुद्राचे पृष्ठभागावर : एकादें स्थळ ३३० फूट उंच असले म्हणजे ते स्थळ ज्या अक्षांशावर आहे, त्या अक्षांशाच्या पलीकडे एका अधिक अक्षांशावर असल्याप्रमाणे होय. म्हणजे ते स्थान एका अक्षांशावर पलीकडे असते, तर तेथें जितकी थंडी असती, तितकी थंडी तितक्या उंचीवर असते. किंवा प्रत्येक ३०० फूट उंचीस १°फा० कमी उष्णता होते, असे म्हटले तरी चालेल. समुद्राचे सपाटीपेक्षां जमीन कांहीतरी जास्त उंच असतेच; व डोंगर, पर्वत हे तर पुष्कळच उंच असतात. म्हणून जमिनीवर समुद्राचे पृष्ठभागापेक्षां पुष्कळ उष्णता कमी असते. सह्याद्रीची उंची सरासरी ४००० फूट धरिली, तर वर सांगितलेल्या मानाने समुद्राचे पृष्ठभागापेक्षा त्यावर १३° उष्णता कमी झाली पाहिजे. ह्याचप्रमाणे इतर ठिकाणची गोष्ट.

 आतां, उंची हे एक उष्णता कमी होण्यास कारण झाले. ह्या