पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



४८

धिक प्राप्त होते. परंतु ग्रहांचे जवळ येणें व दूर जाणे ह्यामध्ये महदंतर नसल्याकारणाने, प्राप्त होणाऱ्या उष्णतेमध्ये विशेष अंतर अनुभवास येत नाही. असे असतां, आपणांस कमीजास्त उष्णता कशी प्राप्त होते ? उन्हाळ्यांतील व हिंवाळ्यांतील उष्णतेच्या मानामध्ये बराच फरक असतो. इतका फरक पृथ्वी सूर्याजवळ आल्यामुळे अगर दूर गेल्यामुळे पडतो असे नव्हे. तर मग, हिवाळा व उन्हाळा हे ऋतु होतात कसे ?

 पृथ्वी सूर्याचे भोंवती फिरतेवेळी आपले आंसाभोंवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. आतां पृथ्वीच्या आंसाचा तिच्या कक्षेशी जर काटकोन झाला असता, तर पृथ्वीवर ऋतु बिलकूल झाले नसते; व पृथ्वीच्या दैनंदिन गतीने दिवस व रात्र ह्यांशिवाय वर्षभर दुसरा कोणताही फेरफार झाला नसता. विषुववृत्तावर मात्र सूर्याची किरणें लंब पडली असती, व तेथे अतिशय उष्णता असती. विषुववृत्ताचे दक्षिणेस व उत्तरेस सूर्याचे किरण अधिकाधिक तिर्कस पडत जाऊन क्रमाक्रमाने उष्णता कमी कमी होत ध्रुवांजवळ अतिशय थंडी झाली असती, व हे उष्णतेचे मान सर्वकाळ सारखेच राहिले असते. आतां दीर्घवर्तुळाच्या ज्या केंद्रस्थानीं सूर्य असतो, त्याजवळ पृथ्वी आली म्हणजे थोडी जास्त उष्णता झाली पाहिजे, हे खरे आहे. परंतु, निरनिराळे ऋतु होण्यासारखा उष्णतेत कांहीं फरक होत नाही, म्हणून मागें सांगितलेंच आहे. ह्याप्रमाणे पृथ्वीच्या आंसाशी जर कक्षेचा काटकोन झालेला असता, तर ऋतुमान झाले नसते; इतकेच नाही, तर पृथ्वीवरील