पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/59

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भाग ४ था.
---------------
पाऊस.

 आतां, दुसरी अवश्यकता पावसाची, त्याविषयी सविस्तर विचार करू.

ऋतु.

 प्रचारामध्ये आपण वर्षाचे *तीन काळ मानितों : उन्हाळा, पावसाळा व हिंवाळा. ह्यांसच ऋतु ही संज्ञा देता येईल. हिंदुस्तान देशापुरता विचार केला असतां हें ऋतुमान बरोबर आहे. परंतु सर्व भूगोलाचा विचार केला तर हे मान चुकीचे आहे. कारण, उन्हाळा व हिंवाळा हे ऋतु सर्व पृथ्वीवर नियमित काळीं नियमाने होतात; परंतु पावसाचा तसा नेम नाहीं. कित्येक देशांमध्ये पाऊस वर्षभर पडत असतो, कित्येक ठिकाणी नियमित काळी मात्र पडतो, व कांहीं ठिकाणी तर मुळीच पडत नाही. ह्यामुळे पावसाळा सर्वसाधारण स्वतंत्र ऋतु मानणे रास्त होणार नाहीं. वास्तविक ऋतु म्हटले म्हणजे दोन : उन्हाळा व हिंवाळा. पाऊस हा पुष्कळ गोष्टींवर अवलंबून असणारा स्वतंत्र सृष्टव्यापार आहे.

 हिंवाळा व उन्हाळा म्हणजे उष्णतेचे कमीअधिक प्रमाण होय. हे प्रमाण कमीअधिक होण्याचे कारण काय ? उष्णता सूर्यापासून

-----

 * इंग्लंड वगैरे थंड देशांत चार काळ मानण्याचा परिपाठ आहे,