पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



३७

 आतां, झाडे कोणत्या रसायनपृथक्करणाने थंडी उत्पन्न करितात ते पाहू. झाडाचे मुख्य शरीर लाकूड होय. त्या लाकडामध्यें शेकडा २५ भाग कोळसा असतो. बाकी नैट्रोजन, पाणी, पोट्याश वगैरे पदार्थ असतात. झाडे आपल्या पोषणास लागणारे पदार्थोपैकीं कार्बन खेरीजकरून बाकीचे सर्व पदार्थ जमिनीच्या द्वारें शोषण करितात, व कार्बन ( कोळसा ) मात्र हवेमधून घेतात. हवेमध्ये हरहमेशा १००० स ४ भाग कार्बनिक आसिड वायु असतो. ज्या ठिकाणीं ज्वलनादि क्रिया चाललेल्या असतात व मनुष्यसमूह पुष्कळ असतो, त्या ठिकाणी ह्या वायूचे प्रमाण जास्त असते. कारण, ज्वलनापासून व प्राण्यांच्या श्वासोच्छवासापासून नेहमी हा वायु उत्पन्न होत असतो. ह्या वायूचे घटकावयव कार्बन व ऑक्सिजन असे आहेत. सूर्यकिरणांचे साहाय्याने झाडे ह्या वायूचे पृथक्करण करून कार्बन आपले पोषणास शोषून घेतात, व ऑक्सिजन वायु मोकळा करितात. झाडांची ही क्रिया दिवसां सतत चालू असते.

 झाडांची ही क्रिया चांगली स्पष्टपणे कळण्यास एक लहानसा प्रयोग आहे, व तो पाहिजे त्यास करितां येण्यासारखा आहे. खडूवर सल्फ्यूरिक अगर दुसरें एकादें आसिड ओतून त्यापासून कार्बनिक आसिड वायु उत्पन्न करावां. हा वायु पाण्याच्या आकारमानाइतका त्यांत विरतो. वायु उत्पन्न करण्याची व तो विरवण्याची कृति खालीं लिहिल्याप्रमाणे करावी.