पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



३५

रसायनरीतीने संयोग पावू लागले असतां उष्णता उत्पन्न झालीच पाहिजे. हे अनेक शास्त्रीय प्रयोगांवरून सिद्ध करून दाखवितां येते. परंतु तसे प्रयोग एथे सांगितले असतां फार विस्तार होईल. प्रचारांतही ह्या गोष्टीचे समर्थनार्थ पुष्कळ उदाहरणे आहेत, त्यांपैकी कांहीं सांगतो. चुनकळी घेऊन तिच्यावर पाणी घातले असतां चुनकळी व पाणी यांचा संयोग होऊं लागून चुना उत्पन्न होतो व ह्या रसायनसंयोगापासून उष्णता उत्पन्न होते; व ज्या पात्रांत तो चुना असतो ते इतकें कढत होते की, त्यास हात लाववत सुद्धा नाहीं. ज्वलनापासून म्हणजे लाकूड, तेल वगैरे जाळलें असतां जी उष्णता प्राप्त होते तीही रसायनव्यापारापासूनच होय. लाकडांतील व तेलांतील हैड्रोजन (जलज) व कार्बन ( अंगार ) ह्यांचा हवेतील ऑक्सिजन ( प्राणिज ) वायूशीं रसायनसंयोग होऊन त्यापासून पाणी व कार्बानिक आसिड वायु उत्पन्न होतात, व ह्या व्यापारापासून उष्णता उत्पन्न होते. पुष्कळ दिवस गुरांच्या शेणाची रास एकाच जागी पडलेली असली म्हणजे त्या राशीमध्ये रसायनव्यापार सुरू होऊन त्यापासून उष्णता उत्पन्न होते, व ती रास गरम होऊन तिजपासून वाफा निघू लागतात. तसेच, भट्टींत तयार केलेल्या कोळशांची रास कांहीं दिवसपर्यंत एकेच ठिकाणी राहिली असतां कधी कधी ती आपोआप पेट घेते. ह्याचे कारण असे की, कोळशामध्ये बारीक बारीक छिद्रे असतात त्यांमध्ये ऑक्सिजन वायु कोंडून राहतो; त्या वायूचा कोळशांशीं संयोग होऊं लागून जी उष्णता उत्पन्न होते त्यामुळे कोळसे पेट घेतात