पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



भाग ३ रा.
---------------
थंडी.

 मागील भागांत सांगितलेल्या अवश्यक गोष्टी म्हणजे थंडी, पाऊस व पाण्याचा संचय ह्यांपैकीं थंडी प्राप्त करून घेण्यास साधन काय ह्याविषयीं आतां आपण विचार करूं.

 थंडी उत्पन्न होण्यास आपणांस काय काय उपाय योजिले पाहिजेत ह्याविषयी विचार करू लागलों असतां, हा उद्देश सिद्धीस नेण्यास आपणांस *झाडांवांचून दुसरे साधन नाहीं, असे दिसून येईल. म्हणजे झाडांची संख्या ज्या ज्या मानाने अधिक असते तसतशी थंडीही अधिक उत्पन्न होते. एथे थंडी म्हणजे काय हें सांगितले पाहिजे. थंडी म्हणजे कांहीं निराळा पदार्थ नव्हे; उष्णतेचा अभाव म्हणजे थंडी होय. म्हणून थंडी उत्पन्न करणे म्हणजे उष्णता कमी करणे असे समजावे. आपणांस जी उष्णता मिळते, ती प्रत्यक्ष अगर परंपरेने सूर्याचे किरणांपासून प्राप्त होते. बहुतेक सर्व उष्णता प्रत्यक्षच प्राप्त होते व कांहीं थोडी मात्र ज्वलनापासून, रसायनसंयोगापासून व पदार्थांचे चलनवलनापासून प्राप्त होते. परंतु यासही मूळ कारण सूर्याची किरणेच आहेत. म्हणून मुख्यतः आ-

-----

 * 'झाड ' ह्या संज्ञेचा अर्थ साधारणपणे " लहानथोर सर्व वनस्पति " असा समजावा.