पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३

ला तर कांहींच नाहीं. बहुतेक सर्व देश पावसावर अवलंबून आहे. मग तो पाऊसच पुरेसा न पडला तर लोकांची काय स्थिति होते हें सांगणे नलगे. तशांत, इंग्लंड वगैरे देशासारखी तरी आमची स्थिति आहे काय ? इंग्लंडांत शेतकीवर उपजीवन करणारे लोक फारच थोडे. कारण, लोकवस्तीच्या मानाने जमीनही थोडी व तीही इतकी सुपीक नाहीं. बहुतेक लोकांचा चरितार्थ कलाकौशल्याचे पदार्थ तयार करण्यावर व व्यापारावर चालत आहे. तिकडील लोकांस धान्याचा पुरवठा इतर देशांतून होतो. तिकडे जमिनीच्या पिकाचे महत्त्व फारसें नाहीं; म्हणून पाऊस पडला नाहीं ह्या कारणाकरितां लोकांस खावयास अन्न मिळत नाहीं असे तेथे कधींही होत नाहीं. आमच्या देशांत शेकडा ९५ मनुष्ये शेतकीवर उपजीवन करून राहणारी आहेत; कलाकौशल्य व व्यापार ह्यांस उत्तरोत्तर उतरती कळा लागत चालली आहे; लोकांत त्राण बिलकूल उरलें नाहीं. एक वर्ष पाऊस न पडला तर हाहाकार होऊन जातो. सन १८७७ सालीं जो मोठा दुष्काळ पडला त्याचे तरी कारण हेच. इंग्लंड देशाप्रमाणे ह्या देशाची स्थिति असती, म्हणजे लोकांचे उपजीवन शेतकीशिवाय इतर धंद्यांवर अवलंबून असते, तर लाखों लोक प्राणांस कां मुकते ? ह्याप्रमाणे हिंदुस्तानामध्ये जे जे दुष्काळ पडले ते ते सर्व पावसाच्या अभावामुळेच. नाहीं म्हणावयास अमेरिकेमध्ये सन १८६१ ते १८६५ पावेतों लढाई चालली होती, त्या सालीं हिंदुस्तानांत जी महर्गता झाली, तिचे मात्र कारण निराळे होते. इंग्लंड देशाला कापसाचा पुरवठा