पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/34

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१

असल्यामुळे तहान जास्त लागते व त्या मानाने अन्न कमी खपते; थोडी मेहनत केली कीं, थकवा येऊन हुश्श करीत पडावे लागते; उष्णतेमुळे रात्री झोप चांगली येत नाही व त्यामुळे जिवास आराम न वाटून दुसरे दिवशी सकाळी मनास वाटावी तशी हुशारी वाटत नाहीं. अशा दिवसांमध्ये आपणांस थंड पदार्थांची व थंड हवेची किती अवश्यकता वाटते ! एकाद्या थंड राईमध्ये अगर बागेमध्ये अथवा एकाद्या दाट छायेच्या वृक्षाखाली बसले असतां किती आराम वाटतो ! ह्यावरून थंडीची अवश्यकता आपणांस फार आहे हे उघड होते.

पाऊस

 बहुतेक सर्व थंड देशांमध्ये बारा महिने पाऊस पडत असतो, व पावसाचे सरासरीचें वर्षाचे मान जरी ३० पासून ४० *इंचांपेक्षा जास्त नसते, तरी अवर्षण पडेल ही भीति नसते. उष्ण देशामध्यें

-----

 *अमुक इंच पाऊस पडणे म्हणजे काय ते एथे सांगितले पाहिजे. अमुक ठिकाणी १ इंच पाऊस पडला याचा अर्थ इतकाच की, त्या ठिकाणी पावसाचे पडलेले पाणी वाहून गेलें नाहीं, किंवा जमिनीत जिरलें नाहीं, अथवा दुसऱ्या कोणत्याही रीतीनें नाहींसे झाले नाही, तर त्या ठिकाणी सर्व जागेवर एक इंच खोलीचे ( उंचीचें ) पाणी सांचून राहते असे समजावे. तसेच, ३० इंच पाऊस पडणे म्हणजे, वर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही रीतीने पाणी नाहीसे झाले नाही, तर त्या ठिकाणी ३० इंच खोलीचे पाणी साचून राहणे हे होय. पाऊस किती इंच पडला, हें मोजण्याचे यंत्र असते त्यास " पर्जन्यमापकयंत्र " म्हणतात.