पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



२०

 उष्ण हवेपासून दुसरेही अनेक अहितावह परिणाम घडून येतात. उष्ण देशांत शारीरिक व मानसिक मेहनत फार करवत नाहीं. थोडीशी मेहनत केली की, मनुष्य थकतो व त्यास स्वस्थ पडून रहावेसे वाटते. थंड देशांत मनुष्यास पुष्कळ काम करवते व थकवा लौकर येत नाहीं. जर्मनींत कित्येक लोक १२ अगर १४ तासपर्यंत अभ्यास करतात. तिकडील लोकांचे सुधारणेमध्ये पुढे पाऊल पडण्याचे हे एक कारण आहे. सारांश, मनुष्यास अतिशय थंडीही हितावह नाही व अतिशय उष्णताही हितावह नाहीं. परंतु आपल्या देशांत उष्णतेचे मान तर फार जरब आहे; म्हणून उष्णता जेणेकरून कमी होईल असे उपाय आपणांस अवश्य योजिले पाहिजेत. ह्याचे प्रत्यंतर पाहण्यास आपणांस उष्ण देश व शीत देश घेण्याचीही फारशी जरूरी नाहीं. एकाच ठिकाणचे उन्हाळ्यामधील व हिंवाळ्यामधील स्थिति अशीच आढळून येईल. ही गोष्ट आपले अनुभवास नित्य येते कीं, उन्हाळ्यापेक्षां थंडीचे दिवस आपणांस विशेष प्रिय असतात. ह्या दिवसांत अन्नपचन किती चांगले होते व अन्नास रुचि किती चांगली लागते ! पुष्कळ मेहनत केली तरी थकवा येत नाहीं. ह्याच दिवसांमध्यें तालीमबाज लोक खाऊनपिऊन व मेहनत करून तयार होतात; व उन्हाळा लागतांच फाल्गुनमासी शिमग्याचे सणांत कुस्त्या करतात. हिंवाळ्यात मेहनत करण्यास उल्हास वाटतो, व अंगामध्ये ताकद जास्त असते. उन्हाळ्यामध्ये अन्नास रुचि नसते; हवेच्या उष्णतेमुळे मनुष्याच्या अंगांतील पाणी घर्मरूपाने पुष्कळ निघून जात