पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२९

वगैरे प्रांत ह्यांत पाऊस अगदी कमी असल्यामुळे जंगले आहेत तीं साधारण खुरटी आहेत, यांना निर्जल जंगले म्हणता येईल, ह्यांत महत्त्वाचे झाड नाहीं.

 गलित–पत्र Deciduous जंगलेः- बाकीचा बहुतेक भाग अधिक वृष्टीचा आहे. त्यांत हीं जंगले आढळतात. हीं जंगले फार महत्त्वाची आहेत. ह्यांचा उपयोग लोक, व्यापारी व सरकार ह्या सर्वांस फारच होतो. ह्यांत सागवान मुख्य असून चंदन, रक्तचंदन, अंजन, ऐन, हिरडा वगैरे झाडे प्रमुख आहेत.

झाडे लावण्यास योग्य स्थलें.

 झाडांपासून किती फायदे आहेत, ह्याचे सविस्तर विवरण एथपयेत केले. आतां, झाडे लावण्यास योग्य स्थळे कोणतीं ह्याबद्दल विचार करूं, म्हणजे एकंदर विषयाचा थोडाबहुत समारोप ओघाओघानेच होईल.

 झाडांपासून अनेक फायदे असल्यामुळे जितकी होईल तितकी झाडांची वृद्धि करणे चांगले; परंतु त्यांतही खाली लिहिलेल्या ठिकाणी ती अवश्य लाविली पाहिजेत.

 पर्वत, डोंगर, टेकड्या यांवर - ह्या ठिकाणी झाडे प्रथमतः लाविली पाहिजेत. पाऊस पडण्याकरितां व पावसाचे पडलेले पाणी सांठून राहण्याकरितां, मातीची वृद्धि करण्याकरितां, व पूर वगैरे येऊन नुकसान न व्हावे ह्याकरितां ह्या स्थानांवर झाडे असणे अवश्य आहे. ही स्थाने खडकाळ व उतरती असल्यामुळे लागण करण्यालायक नसतात; व ती स्वभावतःच झाडांनी आच्छादित असतात. परंतु ह्या ठिकाणीं कांहीं लागवड जमीन असल्यास ती