पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२५

वेळोवेळीं कानू करण्यांत आले. अखेर इ० स० १८६५ मध्ये

पहिला जंगलचा आक्ट पसार झाला व ह्याची सुधारणा करण्याकरितां सन १८७८ चा आक्ट अमलांत आला. क्षुल्लक फेरफार होऊन हाच कायदा बहुतेक देशभर हल्ली अमलांत आहे.

 कोणत्याही गोष्टीचे रक्षण करणे म्हणजे तिच्या उपयोगाचे नियमन करणे ही ओघाओघानेच येणारी गोष्ट होय. नियमन झालें कीं, प्रतिबंध आलाच. व प्रतिबंध म्हटला म्हणजे कांहीं तरी अडचण सोसणे जरूर आहे. जो कालपावेतों जंगलचे संरक्षण सरकाराने हाती घेतले नसते तोंपावेतों जंगलावर वस्तुतः जरी सरकारची मालकी असते, तरी ती कोणाच्याच मालकीची नाहीत, असे समजून व्यवहार चालतो व लोकांस त्यांमध्ये मनास मानेल तसे वर्तन करण्यास सांपडते. अशा रीतीने निष्प्रतिबंध वागण्याची संवय झाल्यावर तसे वागण्यास प्रतिबंध झाला म्हणजे अडचण व त्रास वाटणे साहजीकच आहे. तशांत, खेड्यांतील लोकांचे संसारास जंगलाची हरघडी जरूर असल्या कारणाने ही अडचण व त्रास अधिकच भासतात यांत नवल नाहीं. ह्याशिवाय साधारण मनुष्य नेहमी तात्पुरत्या नफानुकसानीकडे पाहणारा असल्या कारणानें पंचवीस तीस वर्षांनीं जंगलची स्थिति सुधारली असतां, अगर निकृष्ट झाली असतां आपलें नफानुकसान किती होईल इतकी दूरवर त्याची नजर पोचत नाहीं; व म्हणूनच जंगलखाते त्यास जुलमाचे वाटत असते.

 मागील भागामध्ये जंगलाचे महत्त्व वर्णन केलेले आहे. त्या-