पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/137

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२४

आहेत याचे यथार्थज्ञान त्या काली नसल्यामुळे जंगलसंरक्षणाकडे ह्या राजांनी लक्ष पुरविलें नाहीं. प्लासीचे लढाईपासून इंग्रजांचे राज्यास सुरुवात झाली असे मानता येईल. त्या वेळीच बहुतेक महत्त्वाचे रानांचा नाश झालेला असावा. तथापि, जीं कांहीं जंगले शिल्लक होती, त्यांचा नाश चालू होताच. जंगलरक्षणापासून होणाऱ्या फायद्यांचे अज्ञान व काळीचा वसूल वाढविण्याकडे मनाचा कल ह्या दोन गोष्टी ह्या नाशास मुख्यतः कारणीभूत झाल्या. त्या वेळी रानरक्षण हे लागवडीस हरकत आणणारे समजत. व डोंगरी जमिनी, की ज्यांवर कायमची लागवड बिलकुल होणार नाहीं त्यांचीही मोजणी करून नंबर पाडून लागणीस देण्यांत आल्या. तशांत आगगाड्या सुरू झाल्या; व त्यामुळे जंगलांचा अतोनात नाश झाला. अशा रीतीनें बहुतेक जंगलें नाहींतशी झाल्यानंतर सरकारचे डोळे उघडले व रानरक्षणाची अवश्यकता त्यास भासू लागली.

 ह्या गोष्टीकडे लक्ष जाण्यास प्रथमतः सरकारचे पब्लिक् वर्क्स खाते कारणीभूत झाले. ह्या खात्यास इमारती लाकडांचा पुरवठा होईना, तेव्हा असे होण्याचे कारण काय, ह्याचा विचार सुरू झाला. व जंगलखात्याचा उद्भव हे त्या विचाराचें फल होय.

 रानरक्षण सरकाराने हाती घेणे म्हणजे प्रथमतः लोकांचे हक्कांचा विचार करावा लागतो. माजी राज्यामध्ये जंगलचे हक्क प्रायः मुद्दाम दिलेले नसत, परंतु जंगलाचा उपयोग पाहिजे तसा करून घेण्याची लोकांची वहिवाट असे. ह्या वहिवाटीचे नियमन करण्याकरिता