पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



११९

हल्लींचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ह्या कालाबद्दल खातरीपूर्वक माहिती मिळण्यास साधन नाहीं. परंतु हिंदुस्तान देशाच्या स्थानावरून व हवामानावरून योग्य अनुमान काढण्यास हरकत नाहीं.

 झाडझाडोऱ्याचे वृद्धीस विवक्षित उष्णतेपेक्षा जास्त उष्णता व विवक्षित ओलाव्यापेक्षा जास्त ओलावा अवश्यक आहे. हिमालय पर्वताचे उच्च शिखरांचा भाग खेरीजकरून बाकी सर्व देशभर उष्णता पुष्कळ म्हणून मागे सांगितलेच आहे. तेव्हां उष्णतेची अनुकूलता उत्तम आहे. आतां, ओलावा कसा आहे ते पाहूं. दक्षिण द्वीपकल्प समुद्राने वेष्टित असल्या कारणाने त्याचा मध्यभाग खेरीजकरून बाकीच्या भाग पाऊस पुष्कळ पडतो व वर्षभर हवेमध्ये आर्द्रता पुष्कळ असते, ह्यामुळे ह्या प्रदेशांत ओलाव्याचे आनुकूल्य उत्तमच आहे. ह्यांतील मध्यभागामध्ये म्हणजे अल्पवृष्टीचे भागामध्ये समुद्राची आर्द्रता चांगली पोहचू शकत नाहीं हे खरे. तथापि, वर्षाचे पावसाचे मान सरासरी २५ इंच असल्याकारणाने इतका ओलावा झाडांचे उत्पत्तीस व वृद्धीस विपुल जरी नाहीं तरी साधारण पुरेसा आहे. उत्तर व मध्य हिंदुस्तानांतील अति वृष्टीचे व अधिक वृष्टीचे जे भाग आहेत तेथेही ओलाव्याची कमतरता नाहीं. एथे अल्पवृष्टीचा जो भाग आहे, त्याची स्थिति वरील अल्प वृष्टीच्या भागासारखीच आहे. राहतां राहिलेला वायव्येकडील अनावृष्टीचा प्रांत. ह्यांत मात्र ओलावा अगदीच नसतो म्हटले तरी चालेल. तथापि, सिंधुनद व पंजाबांतील कांहीं नद्या ह्यांच्या कांठचा प्रदेश ह्यांमध्ये आर्द्रता विपुल असते. सारांश,