पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



११२

म्हणजे फक्त रक्ताची शुद्धी होत नाहीं इतकेच नव्हे, तर हा वायु

विषकारक असल्यामुळे शरिरास अपायकारक होतो. कोट्यवधि प्राणी उच्छासाबरोबर जो कार्बानिक आसिड वायु बाहेर टाकितात तो जर हवेमध्ये तसाच राहील, तर कोंडलेल्या खोलींतील हवेच्या स्थितीप्रमाणेच पृथ्वीवरील सर्व हवेची स्थिति होईल, व प्राण्यांच्या रक्ताची शुद्धि होणार नाहीं. इतकेच नव्हे, तर १०० भाग हवेत पांच भागपर्यंत कार्बानिक आसिड वायूचे प्रमाण वाढले म्हणजे असल्या हवेत कोणताही प्राणी जगणार नाहीं.

 वरील विवरणावरून हवा शुद्ध असणे हें, किती महत्त्वाचे आहे. हे दिसून येईल. शुद्ध हवा म्हणजे तिजमध्ये कार्बानिक आसिड वायूचे प्रमाण अगदी कमी व ऑक्सिजन वायूचे फार. कार्बानिक आसिड वायु हा कार्बन व ऑक्सिजन ह्यांचा बनलेला असता. ह्या वायूमधून ऑक्सिजन वायु मोकळा करण्याची क्रिया झाडे सूर्याच्या तेजाच्या साह्याने करीत असतात. तीं कार्बनिक वायु आपले पोषणास घेऊन ऑक्सिजन वायु मुक्त करीत असतात. ह्यामुळे हवेतील ऑक्सिजन वायूचे प्रमाण पूर्ववत् होत असते. अशा रीतीने झाडे हवेची शुद्धता करीत असतात.

 हवेच्या शुद्धीकरणाची क्रिया झाडे दिवसां मात्र करीत असतात. रात्रीं तीं थोडा ऑक्सिजन वायु हवेतून ओढून घेऊन कार्बानिक आसिड वायु बाहेर टाकतात. त्यामुळे रात्री झाडांजवळील हवेमध्ये ह्या वायूचे प्रमाण जास्त असल्यामुळे हवा अशुद्ध असतें. झाडाखालीं रात्रीं निजू नये, म्हणून जी आपल्यांत म्हण आहे ती याच कारणामुळे पडली असावी असे वाटते.