पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१०९

झाडांच्या उत्पत्तीस लायक होते. व तिच्यावर मोठी झाडे उत्पन्न झाली म्हणजे त्यांची पाने दर वर्षी गळून पडून तीं व बारीकसारीक वनस्पति ही दोन्ही मिळून कुजून जंगलांतील जमिनीवर थरांचे थर बसत असतात. जंगलचे जमिनींत झाडांची पानें कुजून उत्तम खत होते ही गोष्ट आपले लोकांस चांगली माहीत आहे. कोंकणामध्ये डोंगराचे पायथ्याशीं ज्या भातजमिनी असतात त्यांमध्ये आरंभीचे पावसाने डोंगरावरील मळी वाहून येऊन बसते व तिजमुळे त्या ठिकाणीं भात उत्तम पिकते हें सुप्रसिद्ध आहे.

 झाडे परंपरेनेही शेतास जास्त खत मिळण्यास कारणीभूत होतात. शेतास निरिंद्रिय खतांपेक्षां सेंद्रिय खते चांगलीं. व त्यांतही जमिनींतून ज्या जातीची द्रव्ये आपण काढून घेतों त्या जातीची द्रव्ये ज्यां खतांत आहेत ती द्रव्ये उत्तम. धान्याचे काडकडब्यांत असणारी द्रव्ये पुष्कळ अंशीं गुरांचे शेणांत असतात; म्हणून शेण हे उत्तम खतांपैकी एक खत होय. परंतु कित्येक प्रांतांमध्ये जळाऊ लाकडांची कमताई असल्यामुळे, लोक निरुपायास्तव शेणाच्या गोवऱ्या करून सर्पणाचे ऐवजी जाळतात व त्या योगाने शेतास जे एक उत्तम खत मिळावयाचें तें नाहींसें होतें. ही स्थिति बहुतकरून आपल्याकडे देशांत आहे. इकडे झाडे पुष्कळ झाली असतां लोकांस स्वस्त सर्पण मिळून शेणाचा खताकडे सहज उपयोग होईल.