पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१०१
जमिनीचे बंधन

 झाडांपासून दुसरा एक महत्त्वाचा उपयोग आहे. तो हा की, नद्या, नाले ह्यांस पूर येऊन त्यापासून जे नुकसान होते, ते झाडे लाविल्याने बंद होते. एकाद्या उच्च जागेवर झाडे नसली म्हणजे त्या ठिकाणी पावसाचे जे पाणी पडते, त्यास कांहीं अटकाव न झाल्यामुळे त्यास त्या जागेमध्ये मुरण्यास अवधि न सांपडून ते एकदम सोसाट्याने वाहात लागलीच खाली येते. ह्यामुळे टेकड्या, डोंगर, पर्वत वगैरे उच्च जाग्यावर जी माती असते, तिला कांहीं आधार नसल्यामुळे पाण्याच्या जोरासरशीं तीही खालीं वाहात येते. अशा रीतीने उत्तरोत्तर डोंगरावरची माती नाहीशी होत जाऊन खडक इतका उघडा पडतो की, जमिनीमध्ये थोडेसुद्धां पाणी जिरण्यास मार्ग रहात नाहीं. ह्यामुळे तो डोंगर इतका नापीक होतो कीं, पुढे त्यावर गवतसुद्धा उगवत नाहीं. मग झाडझाडोऱ्याचें नांवसुद्धां घ्यावयास नको. बरें, हें पाणी डोंगराचेंच नुकसान करून राहते तरी कांहीं बरें; परंतु तसे होत नाहीं, तें आणखी नुकसान करिते. उच्च जागेवरून एकदम पाणी वाहून आलें म्हणजे नद्या, नाले, यांस मोठमोठाले पूर येऊन कित्येक पूल, रस्ते, घरेदारें, शेते यांची फारच नासाडी होते. तसेच, डोंगरावरून जी माती वाहून येते, तिच्या योगाने डोंगराचेंच नुकसान होते असे नाहीं; त्या मातीबरोबर डोंगरावरील लहानसहान धोंडेही खालीं वाहून येतात व मोठमोठाल्या धोंड्यांखालचीसुद्धा माती वाहात जाऊन त्यांस धर नाहींसा होतो, व ते गडबडत