पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/113

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१००

आमच्या हातांतील उष्णता झटदिशीं ओढून घेतात, त्यामुळे आपणांस थंडीचा भास होतो. परंतु लोकरीवर हात ठेविला असतां,

ती अवाहक असल्यामुळे आमचे हातांतील उष्णता ओढून घेत 

नाहीं, म्हणून ती गरम आहे असे आपणांस वाटते.

 ह्याचप्रमाणे, जो पदार्थ उष्णतेचा वाहक असतो तो निवतोही लौकर व जो अवाहक असतो तो लौकर निवतही नाहीं. धातूचे भांडे तापतेही लौकर आणि ते तापून थोडा वेळ थंड हवेत ठेविलें कीं, लागलींच थंड होते. पाणी तापण्यासही फार उशीर लागतो; व ते तापवून थंड हवेत ठेविलें असतां, लौकर निवतही नाहीं. वाहक पदार्थ आहेत तेच थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी अवाहक पदार्थांपेक्षा जास्त निवतात, म्हणजे जास्त थंड होतात. अशा पदार्थांपैकी जे पदार्थ दंव पडण्याइतके थंड होतात, त्याजवर दंव पडते. झाडे हीं अशीं लौकर निवणारी आहेत. झाडांच्या ह्याच धर्मामुळे त्यांजवर दहिंवर जास्त पडते.

 आपण थंडीच्या दिवसांत नेहमी पाहतों कीं, लाकूड, धोंडे, माती यांवर दहिंवर सहसा पडलेले नसते. परंतु गवत, लहान झाडे व मोठमोठाली झाडांची पाने यांवर दहिंवर विपुल पडलेल असते. जंगलांत झाडे विपुल असल्यामुळे इतर ठिकाणांपेक्षां जंगलांत किती दहिंवर पडते हे कित्येकांस अनुभवावरून माहीत असेलच. ह्यावरून देशामध्ये झाडांची संख्या जितकी जास्त असेल तितकें दहिंवर जास्त पडेल, हे उघड झाले.