पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



९९

जरी हात लाविला, तरी ते लाकूड ऊन लागत नाहीं. लोखंडाची पळी ही उष्णतेची वाहक आहे, म्हणून तिजला उष्णता लाविली असतां ती लौकर तापते; आणि लाकूड अवाहक असल्यामुळे ते लौकर तापत नाहीं. आधणाच्या पाण्यामध्ये पळी व लाकूड हीं कांहीं वेळ ठेवावीं, नंतर त्यांस हात लावून पहावे; पळी इतकी तापते की, तिला हात लाववत सुद्धा नाहीं, परंतु लाकूड फारसे तापलेले नसून थोडेसे गरम मात्र लागते.

 कोणत्या वस्तु वाहक आहेत व कोणत्या अवाहक आहेत हें साधारणतः त्यांस हात लावून पाहिल्याने समजते. सकाळींच कित्येक वस्तूस हात लाविला असतां कांहीं फार गार लागतात, व कांहीं गरम लागतात. उदाहरणार्थ, धातूच्या भांड्यांस हात लाविला असतां तीं फार थंड लागतात, व लोकरीच्या वस्त्रांस हात लाविला असतां तीं गरम लागतात. वास्तविक पाहतां दोन्ही प्रकारच्या वस्तु थंडीमध्ये फार वेळ पडलेल्या असतात. तेव्हां एक वस्तु थंड व एक गरम होण्यास कांहींच कारण नाहीं. मग एक थंड कां व दुसरी गरम कां ? अमुक एक पदार्थ जास्त उष्ण किंवा जास्त थंड ह्याची खरी परीक्षा आमचे स्पर्शेद्रियास होत नाहीं. ही परीक्षा उष्णतामापकयंत्रानेच केली पाहिजे. वरील दोन्ही पदार्थांची उष्णता उष्णतामापकयंत्राने मोजिली असतां सारखीच भरेल. मग आपले हातास एक उष्ण व एक थंड असा कां भास व्हावा ? तर ह्याचे कारण इतकेंचे कीं, धातूच्या भांड्यास आपण हात लाविला असतां धातु उष्णतेचे शीघ्रवाहक असल्यामुळे