पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



९३

चेच पीक जास्त होते. आपल्या ह्या दक्षिणेत कोंकणामध्ये, व मावळामध्ये खरीपाचीं पिकं होतात, व देशामध्यें रबीचीं पिके होतात. मद्रासेकडेही रबीचे पीक जास्त होते. खरीपाचे पिकापेक्षा रबीचेच पीक मोठे महत्त्वाचे व विपुल होय. खरीपाचीं पिकें कितीही चांगली आली तरी सर्व देशास त्यापासून धान्याचा पुरवठा होत नाही. आमच्या इकडे कोकणांत तर पीक नेहमी चांगले येते, व मावळांतही सहसा अवर्षण पडून नापीक होत नाहीं. इकडे दुष्काळ पडणें न पडणे हे सर्वथैव देशावरील रबीच्या पिकावर अवलंबून असते. हे रबीचे पीक इतक दांडगें असतें कीं, साधारण जरी पीक झाले, तरी त्यापासून लोकांस दोन वर्षे पुरवठा होण्यासारखा असतो. व चांगले पीक झाले, तर चार पांच वर्षेसुद्धा ते पुरण्यास हरकत नसते. खरीपाचीं पिके चांगली होऊनही रबीचीं पिकें न झाल्यामुळे आमच्या इकडे पुष्कळ दुष्काळ पडले आहेत. सारांश, रबीचीं पिके वाढविण्याविषयी आपणांस होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. रबीचे पिकाची वाढ विशषेकरून दहिंवरावर होते. म्हणून दहिंवर जास्त पडण्याकरितां आपणांस उपाय योजिले पाहिजेत.

 आपली ही अवश्यकता आपणांस झाडांपासून भागविता येते; ती कशी हे आतां पाहूं.

 दहिंवर पडण्यास दोन साधने लागतातः पाण्याची वाफ हे एक, व दुसरें थंडी. हवेमध्ये जी पाण्याची वाफ कमजास्त प्रमाणाने नेहमी मिश्रित असते, तिजपासूनच दहिंवर प्राप्त होते. नैर्ऋत्येकडील