पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



९१

पौंड होईल. एका एकरावर जर इतके पाणी पडते, तर अशा हजारों एकरांवर किती पाणी पडत असेल ह्याची कल्पना करितां येते. म्हणून इतक्या पाण्यापैकी, थोडे जरी पाणी मुरून राहिले, तरी पुरे आहे.

 आपल्या ह्या दक्षिणेमध्ये सह्याद्रि व त्याच्या असंख्य शाखा हे फारच महत्त्वाचे पाण्याचे सांठे आहेत. ह्यांपासून पश्चिमेस अनेक नद्या निघून अरबी समुद्रास मिळतात व पूर्वेसही मोठमोठ्या नद्या निघून पूर्वेस वाहात जाऊन बंगालचे उपसागरास मिळतात. ह्या पर्वतावर पावसाचे पाणी किती पडते, हे वरील उदाहरणावरून स्पष्ट झालेच आहे. हे पाणी बऱ्याच अंशीं मुरून राहिले असता किती फायदा होणार आहे !! पाणी मुरून राहण्यास झाडांवांचून दुसरा सुलभ मार्ग नाहीं. ह्याकरितां, ह्या सर्व अफाट प्रदेशावर झाडे लाविली पाहिजेत, व जीं आहेत तीं राखली पाहिजेत.

 आपल्या देशाच्या ज्या तीन मुख्य अवश्यकता म्हणजे थंडी उत्पन्न करणे, पाऊस पाडणे, व पावसाचे पाणी सांठवून ठेवणे त्या, झाडांपासून कशा प्राप्त करून घेता येतात ह्याचे इत्थंभूत वर्णन वर केलेच आहे. त्यावरून आपल्या ह्या उष्ण देशांत झाडे किती महत्त्वाची आहेत, हे स्पष्ट होते.

--------------------