पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ३१ )

मुसलमान हे आपले देशबांधव आहेत, तेव्हां ह्यांच्याचबरोबर आपण कसें लढावें, हा विचार त्यांच्या मनांत यावयाचाच नाहीं. अशीच स्थिति हिंदूंचीहि होती. तसेंच आपल्या धन्याचें निमक एकवार चाखिलें म्हणजे मरेपर्यंत विश्वासुकपणानें त्याची चाकरी करणें, हेंच अब्रूचें काम आहे, अशी ह्या नेटिव्ह शिपायांची समजूत असे, व ही गोष्ट दुप्लीला माहीत होती. ह्यामुळे नेटिव्ह शिपायांस पगार देऊन व त्यांना युरोपियन अंमलदारांकडून कवायत शिकवून त्यांचें एक सैन्य दुप्लीनें तयार केलें; व ह्या सैन्याच्या जोरावर तो नेटिव्ह संस्थानिकांच्या भांडणांत पडू लागला; व हिंदुस्थानांत त्याचें लवकरच इतकें वजन वसलें कीं, हा देश जिंकून घेण्याचा जो विचार त्याच्या मनांत घोळत होता तो सिद्धीस जाण्याची चांगली संधी आली आहे, असें लोकांस वाटू लागलें.
फ्रेंच व इंग्रज ह्यांची चढाओढ
  जेव्हा फ्रेंचांनी असा प्रकार सुरू केला, तेंव्हा इंग्लिशांना त्यांचें अनुकरण करण्यावाचून मार्गच उरला नाही. जर आपण असे केले नाही, तर आपला सर्व व्यापार आपल्या हातून खचित जाईल, व कदाचित् हे फ्रेंच लोक आपणांस हिंदुस्थानांतून अजीबात हकलून देतील, असें त्यांस दिसून आलें. म्हणून केवळ स्वसंरक्षणार्थ त्यांनीं फ्रेंचांचा कित्ता वळविला, पगार देऊन शिपाई ठेविले,