पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( २८ )

लोकांनीं हे बेट इंग्लिशांस दिलें होतें. पुढें १६९६ साली बंगालच्या नाबाबापासून गंगा नदीच्या मुखाजवळ कलकत्ता येथें एक नवी वसाहत कंपनीनें भाड्यानें घेतली. मद्रास, मुंबई व कलकत्ता ह्या तीन वसाहती हिंदुस्थानांतील ब्रिटिश अमलाचीं हल्लींचीं मुख्य स्थानें आहेत. इंग्लिश कंपनी ह्याप्रमाणें वसाहती करीत असतां पोर्तुगीज, दच व फ्रेंच हेहि वसाहती करीत होते.
हिंदुस्थान जिंकण्याची फ्रेंचांची योजना
 १८व्या शतकाच्या आरंभीं हिंदुस्थान ज्या बेबंद पातशाहीच्या स्थितींत पडलें होतें, ती स्थिति व्यापारास धोक्याची होती, हें उघड आहे. ह्या वेळेपर्यंत युरोपियन व्यापा-यांनी आपलें तनमनधन केवळ व्यापाराला अर्पिलें होतें, व ह्या देशांतील नेटिव्ह लोकांचीं आपापसांत जीं भांडणें चालत असत, त्यांमध्यें ते अगदीं मन घालीत नसत. त्यांच्यापाशीं फौजफांटा कांहीं नव्हता; व आपणांस कोणाकडून त्रास पोहोंचू नये, इतकीच काय ती त्यांची इच्छा असे. परंतु पुढें हा प्रकार बदलला. त्या काळीं फ्रेंच व इंग्लिश हे वसाहतींसाठीं झगडत होते. ह्यामुळे त्या वेळच्या त्या अव्यवस्थित स्थितींत, इंग्लिश व्यापा-यांचा नायनाट करून स्वदेशासाठी हिंदुस्थानांत सार्वभौम सत्ता संपादण्याची अमोलिक संधी आपणांस आपोआप आली आहे, असें हिंदुस्थानांतील फ्रेंच लोकांच्या मनांत आलें, व ही गोष्ट साहजिकच आहे.