पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३४)

तील. वसाहतींसंबंधाची फ्रान्स व जर्मनी ह्यांची उणीव त्या राष्ट्रांच्या ध्यानांत येऊं लागली आहे; व जोपर्यंत वसाहती करण्यासारखे प्रदेश शिल्लक आहेत, तोपर्यंत वसाहतींसंबंधी राज्य स्थापण्यासाठी वेडे वांकडे पाहिजे तसे प्रयत्न करण्यास त्यांनीं आरंभ केला आहे. ( २) आपणांस काय मिळवावयाचें आहे, तें इंग्लिशांच्या पूर्वजांनी स्पष्ट रीतीनें. ठरवून ते मिळविण्याकडेच आपलें लक्ष दिलें; व ह्यामुळेच त्यांना दोनदा वसाहती मिळवितां आल्या. ह्याप्रमाणेच आपला उद्देश स्पष्टपणे ध्यानांत आणून त्याजबद्दलच नेहमीं प्रयत्न सुरू ठेवणें, हाच कोणत्याहि राष्ट्राला यश येण्याचा सर्वांत उत्तम मार्ग आहे. (३) फ्रान्स, स्पेन व इंग्लंद ह्यांपैकी प्रत्येकाच्या वसाहती गेल्या; फ्रान्सनें युरोपांतील लढायांतच सर्व लक्ष घातल्यामुळे त्याच्या वसाहती गेल्या; नवीन वसाहतींवर आपल्या देशांतील जुन्या पद्धतीप्रमाणे अंमल करण्याचा सक्तीचा प्रयत्न केल्यामुळे स्पेन देशच्या वसाहती गेल्या; आणि इंग्लंदच्या वसाहती (युनाय्तेद स्तेत्स ह्या) जाण्याचें कारण असें कीं, इंग्लंदाशी संबंध ठेवण्यापासून आपले जितकें हित होणार त्यापेक्षां तो संबंध तोडल्यानें अधिक हित होईल, असें इंग्लंदानें एका विशेष प्रसंगी मूर्खपणाचें आचरण करून त्या वसाहतींना दाखविलें.

 वसाहतींच्या प्राचीन इतिहासापासून मुख्यत्वें ज्या गोष्टी ध्यानांत ठेवावयाच्या त्या ह्या. त्यांची सांप्रतची व भावी स्थिति झांविषयीं विचार पुढील प्रकरणांत होईल,