पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शहाजहानची दिनचर्या १३५ खात्याची, त्यांतील नोकरांची, त्यांच्या झालेल्या कामाची, शिपायांच्या शिताफीची इ. माहिती सांगत व त्यांपैकी कोणाच्या कांहीं अडचणी असल्यास त्या दूर करून घेत व सर्वांचे समाधान करीत. यापुढे अलाहजरत खास पागेतील घोडी व हत्तीखान्यांतील हत्ती यांची निगा कशी ठेवली आहे हे पाहून अकराचे सुमारास दिवाण-इ-खास मध्ये जात. या ठिकाणी नवीन अधिका-यांच्या नेमणुका, राज्यकारभार इत्यादींसंबंधी अखेरचे हुकूम दिले जात. हे काम दुपारपर्यंत चाले. दुपारी भोजन होई. भोजनांत चैनीपेक्षां किंवा विलासापेक्षां प्रकृतीस माफक व काम करण्यास उत्साह राहील असे पदार्थ । असत. भोजनोत्तर ते आपल्या विद्वान् व गरीब आश्रितांच्या भोजनाची चौकशी करीत. नंतर एक वाजेपर्यंत खास आरामखोलीत जाऊन ते झोंप घेत. दोन वाजतां बाहेर येऊन शुचिर्भूत होऊन ते कुराण वाचीत. दुपारचे नमाज म्हटल्यावर, हातांत जपमाळ घेऊन तोंडाने अल्लाचे नांव घेत ते असदबुर्ज (राजवाड्यांतील एक बुरुज) मध्ये जाऊन बसत. या ठिकाणीं प्रधानमंडळी राजकीय आणि आर्थिक प्रश्नांबद्दल त्यांच्याशी चर्चा करीत व कागदपत्रावर त्यांच्या सह्या घेत. चार वाजतां ते पुनः. दिवाण-इ-आममध्ये जाऊन नेमणुका, जहागिरी इत्यादि प्रश्नांचा निकाल करीत. सूर्यास्ताच्या वेळेस दिवाणइ-आममधून निघून सायंकाळची प्रार्थना करून ते खास दिवाणखान्यांत जात. या ठिकाणीं मधुरभाषी कथाकार, गोड आवाजाचे गवई आणि कित्येक प्रवासी हजर असत. पडद्याआड स्त्रिया बसलेल्या असत. तेथे अलाहजरत आपल्या लहरीप्रमाणे संगीत किंवा गोष्टी ऐकत किंवा देशांतराची माहिती मिळवीत. याप्रमाणे प्रहररात्रीपर्यंत या कार्यक्रमांत निमग्न राहून अलाहजरत झोपी जात. अशा रीतीने आपल्या अधिकारास व इतमामास शोभेल अशी आपली दिनचर्या ठेवीत. अलाहजरतांची ही दिनचर्या तुला उपयुक्त होईल. तुझ्याबद्दल मला अंतःकरणांतून प्रेम वाटते म्हणून हे सर्व लिहिले आहे. अर्थात् मला जे आज आठवू शकलें तेवढयाचे चित्र मी येथे रंगविले आहे. अभ्यास :--प्राचीन विभागांतील उतारे क्र. ७, १७ व २७ वाचून, त्यांत दिलेल्या 'आदर्श दिनचर्ये' शीं शहाजहानच्या दिनचर्येची तुलना करा. [ ५१