पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६) त्यांत येत आहे. पण यामुळे मराठ्यांच्या इतिहासाचा मूळचा सबंध चित्र‘पट वाचकांच्या डोळ्यांपुढून कांहीसा उधळला गेला आहे. जुना चित्रपट उधळला व नवा तयार करणारा एखादा प्रतिभावान् ट्रेव्हिलियन किंवा टॉयनबी अद्याप पुढे आलेला नाही. असा सध्यांचा काल आहे. उपरोक्त पहिल्या तीन साधनांचे टप्पे सोडून चौथ्या ब्रिटिश अंमलांतील इतिहासाच्या साधनांकडे वळल्यावर आपणांस एक नवाच प्रकार दृष्टीस ‘पडतो. इंग्रजांनी आम्हांस जिंकलें तें शस्त्राच्या श्रेष्ठतेपेक्षां शास्त्राच्या वरचढपणामुळे, हे येथेहि पहावयास सांपडते. भरपूर साधने, शास्त्रशुद्धसंपादन, बिनचूक माहिती, तोलदार विवेचन, निर्भीड मूल्यमापन यांनी हिंदुस्थानांतील ब्रिटिश अंमलाचा इतिहास गजबजून गेला आहे. काय घ्यावे व किती टाकावे, काय वाचावे व काय न वाचावे याची पंचाईत ! शोध घेण्यास अडचण नाहीं, परिशिष्टे, सूचि, संदर्भ ग्रंथ, व्यक्तिवार चरित्रे सर्व कांहीं तयार. एवढे की, त्याच्या वाचनाने इंग्रजांनी आमच्या मनाचा पिंडहि जणू इंग्रजीच असा तयार केला. शिवाय परवा परवापर्यंत इंग्रजांचे श्रेष्ठत्व, सर्वशक्तिमानपणा मनास असा जाणवायचा कीं इंग्रजी इतिहासकारांचे विवेचन अगदी बिनतोड वाटावें. येऊन जाऊन मराठी अभ्यासकांनी करावयाचे ते एवढेच की आपले दोष कबूल करण्याचा किंवा ते विवेचकपणे दाखविण्याचा व त्यांतले त्यांत एखाद्या आत्मगुणाची वकिली करण्याचा सोज्ज्वळ प्रांजलपणा दाखवावयाचा. श्री. केळकर कृत 'मराठे व इंग्रज' हे पुस्तक अशा मनोरचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आम्हांस स्वातंत्र्य मिळाले तेहि बोगद्यांतून एकदम बाहेर पडून अंगावर उजेड पडावा त्याप्रमाणे झाले. अशा वेळी इंग्रजी इतिहासकाराच्या विवेचनांचे मूल्यमापन वगैरे व्हावयाचे ते अंमळ हा आकस्मिक संक्रमणकाल संपल्यावरच होईल. खेरीज कित्येक घटनांच्या आपण फारच नजीक असल्याने त्यांचे निवकार मूल्यमापनहि एकंदरीने तूर्त कठीणच आहे. ‘स्वतंत्र भारता'चा तर सध्यां आरंभकाल आहे. त्यांतील कांहीं घटनासंबंधीं उतारे प्रस्तुत पुस्तकांत घेतले आहेत. पण या घटनांचे महत्त्व अथातच कालावधीने ठरणार आहे.