पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण सहावें
हुंडणावळीचे दराविषयक वादाचे रहस्य.

 हुंडणावळीचा रुपयाचा भाव १६ पेन्स असावा कां १८ पेन्स असावा हा वाद १९२६ - २७ सालीं योग्य होता, नंतर १९३१ साली इंग्लंडने आपल्या चलनाचा सुवर्णाशी असलेला संबंध खोडला व रुपयाचा १८ पेन्साचा भाव स्टर्लिंगशी निगडीत केला त्यावेळी फार तर १६ पेन्स कां १८ पेन्स रुपयाचा भाव असावा या वादांत कांही तथ्य होतें, आतां त्या गोष्टीला ६ वर्षे होऊन गेलीं, १८ पेन्सच्या भावांतील अनिष्टपणा निघून जाऊन तो भाव हिंदुस्थानच्या अंगवळणी पडला आहे. अशावेळी या बादाचा विचार करणे म्हणजे केवळ कालाचा दुरुपयोग करण्यासारखे आहे असें कांहीं लोकांस वाटण्याचा संभव आहे. परंतु ७ - १ - ३८ च्या केसरीच्या अग्रलेखांतील खालील उतारा अवलोकन केला असतां सध्यांहि या वादां- तील रहस्य जनतेच्या दृष्टिसमोर असणे किती अवश्यक आहे, हे समजून येईल.
 "निजामशहाचे राजधानीत भागानगरांत ( दक्षिण हैद्राबाद ) गेल्या आठवड्यांत भरलेल्या हिंदी अर्थशास्त्रज्ञांच्या एकविसाव्या वार्षिक अधि- वेशनांत मद्रास विश्वविद्यालयांतील अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. पी. जे. थॉमस यांनी अध्यक्ष या नात्याने केलेल्या भाषणांत या प्रश्नाची ( हिंदुस्था नांतील विचारवंतापुढे जर आज कोणता महत्वाचा प्रश्न असेल तर तो बहुसंख्य लोकांच्या भाकरीचा होय. ) विशेष चिकित्सा केली आहे. डॉ. थॉमस यांच्या भाषणांतील कांहीं मुद्दे स्वीकार्य असून कांहीं अपसिद्धांतांवर आधारलेले आहेत.
 " १९३० सालापासून पाश्चिमात्य देशांत आर्थिक मंदीला प्रारंभ झाला व देशांतील बाजारभाव उतरूं लागून लोकांची क्रयशक्ति कमी झाली. दळणवळणाच्या सुलभ साधनांनी सांप्रत सर्व जग निगडीत झाल्या