पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३०
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

हा १६ पेन्साचा भाव सरकारास टिकवता आला नाही, म्हणून सरकारची कशी तारांबळ उडाली हे आपणास पुढे पहावयास सांपडेल. हल्ली १९३८ फेब्रुवारीमध्ये रुपयांतील चांदीचा भाव सुमारे ५ पेन्सांचे आसपास आहे.)

"टांकसाळी बंद झाल्या याचा शेतक-यांवर अनिष्ट परिणाम"

 या कायद्याने आपले मुख्य नाणे जो ‘रुपया' तो दुर्मिळ करण्याचा सरकारचा हेतु होता. व्यापार जसजसा वाढतो, तसतसे नाणेहि जास्त लागत जाते. हिंदुस्थानचा व्यापार या वेळी जास्त जास्त वाढत होता, त्यामुळे प्रतिवर्षी सुमारे सात कोट चांदीचे नवे रुपये पाडावे लागत; परंतु या कायद्याप्रमाणे नवे रुपये पाडण्याचे मात्र बंद झाले, व व्यापार पूर्वीसारखाच वाढत राहिला. वाढता व्यापार आणि नाण्याची तूट म्हणजे अर्थात् सर्व जिनसांच्या किंमती उतरल्या व शेतांतील धान्याचे जेथे पूर्वी दहा रुपये येत होते, तेथे नंतर आठच येऊ लागले. शेतक-यास सारा पूर्वीइतकाच नंतरहि द्यावा लागे, परंतु त्याच्या धान्याची किंमत मात्र कमी रुपये येई. धान्य विकून उत्पन्न कमी व सरकार देणे पूर्वीइतकेच द्यावे लागे. म्हणजे या कायद्याने शेतक-यावर हा एक नवीन अप्रत्यक्ष करच बसविला असे झाले. सावकाराकडून काढलेले कर्ज व व्याज भागविण्याकरितां पूर्वीपेक्षा जास्त जास्त धान्य विकणे भाग पडू लागले व अशा रीतीने शेतक-यांचे नुकसान झाले.

"या कायद्याचा व्यापारावर झालेला परिणाम"

 १६ पेन्साचा रुपयाचा भाव ठरविल्यामुळे इंग्लंडच्या व्यापाराची सोय झाली, त्यांचा पक्का माल येथे स्वस्त येऊन पडू लागल्यामुळे त्या मालाचा खप वाढला. कारण पूर्वी १ पौंडाचे कापड इंग्लंडहून येथे आणले असतां येथील लोकांस ते ३४° = १८ रुपयांस पडत असे, ते १६ पेन्साचे दराने २६° = १५ रुपयास पडू लागले, व त्यामुळे मॅचेस्टरच्या कापडाचा येथे खप जास्त होऊ लागला. परंतु चीनचे व्यापाराची वाट काय ?