पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/९९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

जगांत आपोआप बदल होतो. तुम्ही स्वतःस पवित्र करा, म्हणजे बाकीचें सारे जग आपोआप पवित्र होईल. आज कसल्या तरी धड्याची जरूर जगाला असेल तर ती ह्याच धड्याची होय. पूर्वकाळी केव्हाही नव्हती इतकी जरूर आज उत्पन्न झाली आहे. लोककल्याणाच्या इच्छेनें आज जो तो अहमहमिकेने पुढे सरसावण्यास धडपडत असतो. माझ्या शेजाऱ्याचे कल्याण कसे होईल ही चिंता आज आपणास इतकी पछाडीत आहे की तीपुढे स्वतःच्या कल्याणाचा विचारसुद्धा आपल्या मनांत येत नाही.. आपण कसे वागत आहों याचा क्षणभरही विचार न करतां अहोरात्र शेजाऱ्याच्या कल्याणासाठी आपण धडपडत असतो. पण अशाने काय होईल ? अशा वागणुकीने जगाचे कल्याण व्हावयाचे नाही. लोकांना सुधारण्याची धडपड करण्यापूर्वी तुम्ही प्रथम स्वतःची सुधारणा करा. तुम्ही सुधारला म्हणजे जग आपोआप सुधारेल. आपण पवित्र झालो म्हणजे जग पवित्र होण्यासाठी काही निराळी योजना करावयास नको. मला जग वाईट का दिसतें हाच आधी मोठा महत्वाचा प्रश्न आहे. माझ्याच अंतरंगांत कांही वाईटपणा नसेल तर जगांत तरी तो मला कोठून दिसेल ? मी पवित्र असेन तर जगांत मला पाप दिसणे ही गोष्ट त्रिकालांतही शक्य नाही. मी स्वतः दुःखीकष्टी का याचा विचार माझ्या मनांत अगोदर आला पाहिजे. माझें दुःख दौर्बल्याने उत्पन्न झालेले आहे ही खूणगांठ स्वतःच्या चित्ताला मी प्रथम पटविली पाहिजे. मी बाल्यदशेत होतो त्या वेळी कित्येक गोष्टी माझ्या मनांत विषाद उत्पन्न करून मला दुःखी करीत; पण आतां तें सामर्थ्य त्या गोष्टींच्या अंगी राहिले नाही. त्याच गोष्टींनी माझ्या आजच्या स्थितीत दुःख उत्पन्न होत नाही याचे कारण काय? याचे कारण हेच की यांचा कर्ता जो मी त्या माझ्या मनांत बदल झाला आहे. ज्या दृष्टीने त्या वस्तूंकडे मी पूर्वी पाहत होतो ती दृष्टि आतां मजपाशी राहिली नाही. यामुळे त्या वस्तूंचे जे काही स्वरूप पूर्वी मला दिसत असे तें आतां दिसत नाही आणि पूर्वीप्रमाणे त्यांजपासून दुःखाचीही उत्पत्ति होत नाही असे उत्तर वेदान्तशास्त्र देतें. द्रष्टा बदलला की दृश्यही अवश्यमेव बदलतें असा वेदान्ताचा सिद्धान्त आहे. याकरितां स्वतःच्या चित्ताला साम्यावस्था प्राप्त करून घेणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. आपल्या चित्ताला अशी साम्यावस्था प्राप्त झाली म्हणजे ज्या