पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/९७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

यांनी हे सारे घडवून आणले होते हे आपल्या लक्ष्यांत आले असेलच. " जातिभेद मोडणारा, विशिष्ट हक्कांचा विध्वंसक, सर्वत्र समता या तत्त्वाचा उपदेशक " अशा अथीची विशेषणे बुद्ध देवाला लावली असल्याचे माझ्या वाचण्यांत आले आहे. मूलतः सर्व मनुष्ये सारख्याच योग्यतेची आहेत असा उपदेश बुद्धांनी केला आहे. भगवान् बुद्धदेवानंतर जे त्याचे श्रमण अनुयायी होऊन गेले त्यांना हे तत्त्व चांगलेसें समजले होते असे दिसत नाही. नवा पंथ निर्माण करून त्यांत कमी अधिक दर्जाचे धर्मगुरु असावे अशा प्रकारचा यत्न त्यांनी केला होता. कोणताही पंथ म्हटला तरी त्याची भरभराट बहुतांशी त्यांतील घटकांच्या भोळेपणावर अवलंबून असते. पंथांतील अनुयायी अज्ञ आणि भोळे असले म्हणजे आपल्या पंथाच्या धर्मगुरूंच्या मागे मेंढरासारखे जावयाचे. हा भोळेपणा कायम राखावयाचा असेल तर तेथे सर्वत्र समता हे तत्त्व उपयोगी पडावयाचे नाही. सर्वच जर सारखे तर पायां पडणारा कोणी नाही आणि पडून घेणाराही कोणी नाही. केवळ लौकिक दृष्टया अशा पंथाची बोलबाला फारशी व्हावयाची नाही हे उघड आहे. हिंदुस्थानांतील धर्मविचाराच्या पायांत श्रृंखला केव्हांच पडली नाही. अगदी रानटी धर्मापासून ‘सर्वं खल्विदं ब्रह्म ' येथपर्यंत ही वाढ एकसारखी अविरतपणे होत गेली. धर्मयुद्ध अथवा धर्मासाठी छळ असा प्रकार तेथे केव्हांच घडला नाही. या बाबतींत समाजांतील प्रत्येक व्यक्तीला तेथें पूर्ण स्वातंत्र्य होतें. धर्मवेडामुळे रक्तपात झाला असें एकही उदाहरण हिंदुस्थानच्या धर्माच्या इतिहासांत आढळावयाचे नाही आणि याचें सारें श्रेय मुख्यतः अद्वैत मतालाच दिले पाहिजे. देशांतील साऱ्या वस्तीला स्वेच्छेनुसार कोणत्याही धर्मास अनुसरण्याची पूर्ण मुभा असावी आणि धार्मिक बाबतींत कोणाचाही छळ होऊ नये अशी स्थिति हिंदुस्थानांत प्राचीन काळापासून आहे ही गोष्ट त्या देशाला फार भूषणावह आहे असे म्हटले पाहिजे. नीति हे वेदान्ताचें एक व्यावहारिक रूप आहे. कोणत्याही काळी झाले तरी समाजाला नीति ही पाहिजेच. तिची आवश्यकता प्राचीन काळी होती आणि आता ती नाहीं असें नाही. किंबहुना आज मितीला तर या नीतिबंधनांची आवश्यकता अधिकच प्रखर भासू लागली आहे. हल्लीच्या काळी वाढत्या ज्ञानाबरोबर हक्क बजावण्याचे खूळ किती तरी पटीने वाढले आहे.