पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] वेदांत व हक्क. ८७

आवडतीच आहेत. ही सारी त्या एका मुक्कामाला जाण्याकरितांच निघाली आहेत. आपण सारे एकाच प्रवाहांत सांपडलों असून अमर्याद स्वातंत्र्याला पोहोचण्याकरितां आपापल्यापरी आपण सारेच धडपडत आहों. हा प्रवाह परत फिरविण्याचे सामर्थ्य आपणांपैकी कोणासही नाही. त्याचप्रमाणे त्याच्या उलट जाण्याचेही सामर्थ्य कोणास नाही. कोणी कितीही धडपड करो, त्याला उलट जातां यावयाचेच नाही. उलट जाण्याचा यत्न तो करूं लागला तरी प्रवाहाचा जोर त्याला पुढे ढकलील आणि अखेरीस स्वतंत्रतेच्या अफाट सागरांत तो त्याला पोहोंचतें करील. हे सारे विश्व जन्मास आले तेव्हां त्याच्याबरोबरच हा हेतुही जन्म पावला आहे. ज्या मुक्तिसागरांतून विश्व बाहेर पडले, त्याच सागराला परत जाण्याकरितां धडपडू लागल्याबरोबर तें स्पष्टत्वास आले. स्पष्टत्वास आले याचाच अर्थ तें जन्म पावलें. आपण या जगांत आलों या क्रियेचाच अर्थ हा की आपण त्या मध्यबिंदूकडे जाण्याची धडपड करू लागलो. त्या मध्यबिंदूकडे आपलें आकर्षण सुरू झाले. या आकर्षणाची जी स्पष्टदशा तीच प्रेम या नांवाने आपण ओळखतों. अव्यक्तदशेत असतां जी स्थिति आनंद ह्मणविते तीच स्पष्टदशेत प्रेम या नांवास पात्र होते. हे सारें विश्व आले कोठून, तें राहतें कोठे आणि अखेरीस ते जाणार कोठें ही प्रश्नावली वारंवार ऐकू येत असते. याकरितां तिचेही उत्तर येथे देणे इष्ट आहे. याचे उत्तर हेच की विश्वाचा उद्भव प्रेमांतून झाला असून त्याचे वास्तव्य प्रेमांत आहे आणि त्याचे पर्यवसानही प्रेमांतच होणार आहे. अशा रीतीने या विश्वाच्या अंतर्बाह्य प्रेमसागर पसरला असल्यामुळे कोणाची इच्छा असली तरी त्याच्या बाहेर पडणे त्याला शक्यच नाही. त्या आनंदसागरापासून लांब जावें असें कोणाला कितीही वाटले तरी तसे करता येणे त्याला शक्य नाही. कोणाची इच्छा असो अथवा नसो, या मध्यबिंदूकडे त्याला गेलेच पाहिजे. आपल्या गतीचा हा अपरिहार्यपणा जाणून तेथे लवकर पोहोंचावें असा हेतु मनांत धरून अनुकूल मार्गाने आपण खटपट करूं लागलों तर आपला मार्ग सुगम होतो. त्यांतले खड्डे आणि त्यांतली कुंपणे नाहीशी होतात आणि कालावधीही कमी लागतो.
 येथवर केलेल्या विवेचनावरून आणखीही एक सिद्धांत आपल्या ध्यानी सहज येण्यासारखा आहे. सर्वज्ञत्व आणि सर्वशक्तिमत्व ही बाहेरून कोठून