पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

तही शंका घेण्याचे कारण नाही. तें अवश्यमेव घडेल. हा फक्त कालावधीचा प्रश्न आहे; पण आत्म्याच्या अनंत तत्त्वांत काल किती लोटला या प्रश्नाला कितपत महत्त्व आहे ? एखाद्या मोठ्या सागरांत एखाद्या बिंदूला जितकें महत्त्व तितकेंच आत्मरूपांत कालकल्पनेला आहे. याकरितां हा अनुभवाचा काल कितीही दीर्घ असला तरी तोपर्यंत स्वस्थ मनाने वाट पाहण्यास आपणास हरकत नाही.
 या अफाट विश्वांतील यच्चयावत् वस्तू याच साध्याकडे धाव घेत आहेत. कोठे त्याची जाणीव आहे आणि कोठे ती नाही इतकाच फरक. दुसऱ्या ग्रहाच्या आकर्षणशृंखलेत सांपडून गरगर फिरणारा चंद्रसुद्धा त्या शृंखलेतून बाहेर पडण्यासाठी धडपड करीत आहे, आणि एके दिवशी त्याच्या या धडपडीला अवश्य यश येऊन या चक्राकार परिभ्रमणांतून तो मुक्त होईल. आपण कोणत्या साध्याला पोहोचण्याची खटपट करीत आहों याचे भान त्या चंद्राला नसल्यामुळे तें सिद्ध होण्यास दीर्घ कालावधि लोटेल; पण ही जाणीव ओळखून आणि ती पक्की मनांत धरून यशः सिद्धीकरितां जो कोणी खटपट करील त्याचा कालावधिही अलीकडे येईल.
 केवळ व्यावहारिक दृष्टीने पाहतां अद्वैत मताच्या या उपपत्तीचा एक फार मोठा उपयोग आहे. तो हाच की ही उपपत्ति ज्यांना पटेल त्यांना खऱ्या विश्वव्यापी प्रेमाचे रहस्य समजेल. 'तूं आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर,' 'जगांत सर्वत्र बंधुप्रेमाची वाढ झाली पाहिजे' असल्या वाक्यांचा उचार आपणास नेहमी ऐकू येत असतो; पण असें कां असावे असा प्रश्न कोणी केल्यास त्याचे समाधानकारक उत्तर मात्र मिळत नाही. मी माझ्या शेजाऱ्यावर प्रेमच कां करावें आणि त्याचा द्वेष का करू नये असे कोणी म्ह्टल्यास, त्यास वेदान्ताशिवाय समाधानकारक उत्तर देणारा दुसरा कोणीही भेटणार नाही. आपण सारे एकाच मुक्कामाला जाण्यास निघालेले प्रवासी आहो. ही सर्व झाडे आणि हे चतुष्पाद हेसुद्धा आपले सोबती-प्रवासीच आहेत. केवळ मनुष्यत्र माझा प्रवासी बंधु आहे असे नाही, तर पशुपक्षी आणि झाडेझुडपें हीसुद्धा माझ्या बांधवांपैकीच आहेत. त्याचप्रमाणे केवळ सजन तेवढेच माझे बंधु असे नसून चोर, जार हेसुद्धां माझे भाऊच आहेत. ईश्वरभक्त तेवढेच माझे लाडके नसून दुष्ट माणसेंसुद्धा माझी