पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] वेदांत व हक्क. ८५

आत्मा अनंत, केवलरूप, अमर्याद आणि सच्चिदानंदरूप असल्यामुळे त्यांत केव्हाही बदल होणे शक्य नाही. त्याचप्रमाणे तो जन्माला येणे शक्य नाही, अथवा तो मरणेही शक्य नाही. जन्म, मृत्यु, स्वर्गवास इत्यादि अवस्था आत्म्याच्या ठिकाणी संभवत नाहीत. हे सारे निरनिराळे देखावे मात्र आहेत. मृगजलांत अनेक आकारांचे तरंग निर्माण व्हावे अथवा त्यांत अनेक प्रकारच्या वृक्षांची प्रतिबिंबे डोलतांना आढळावी, त्यांतलाच हा सारा प्रकार आहे. स्वप्नांत आपण अनेक देखावे पाहत असतो. क्षणांत स्वर्ग आणि क्षणांत मृत्युलोक यांची दर्शनें आपणास घडत असतात. पण त्यांत सत्याचा अंश कितीसा आहे बरें ? तोच प्रकार आपल्या जन्ममृत्यूंचाही आहे. एखाद्या माणसाला स्वप्न पडूं लागले म्हणजे त्यांतील देखाव्याने अनेक प्रकारची विचारमालिका त्याच्या मनांत सुरू होते. अनेक सुष्टदुष्ट विचार त्याच्या चित्तांत उद्भवतात. त्याच्या हातून अनेक दुष्कृत्येही घडत असतात. काही काळाने याच विचारांतून आणि कृत्यांतून दुसरी नवी स्वप्ने जन्म घेतात. आपल्या दुष्कृतीने आपणास एखाद्या भयंकर जागी लोटून दिले असून तेथे आपणास परमावधीच्या यातना भोगाव्या लागत आहेत असेंही स्वप्न तो पाहूं लागतो. सुविचारांची स्वप्ने ज्याला पडत असतील आणि आपण सत्कर्माचे आचरण करीत आहों असें जो पाहत असेल, त्याचें तें स्वप्न संपल्यानंतर आपण सुखमय स्वर्गात आहों असें दुसरें स्वप्न पडू लागेल. अशाच रीतीने स्वप्नामागे स्वप्न आपण पाहत असतो. एक स्वप्न संपतें न संपतें तोच दुसऱ्याला सुरवात होते. पण या साऱ्या स्वप्नांची कायमची इतिश्री होण्याची वेळ केव्हां तरी येईल. अशी वेळ आपणांपैकी प्रत्येकास येणार आहे. हे सारे विश्व खरोखर स्वप्नाहून अधिक योग्यतेचें नव्हते असें त्या वेळी आपणास निःसंशय कळून येईल; आणि त्याच वेळी सभोवतालच्या आवरणाहून आत्मा अगदी भिन्नरूप आहे अशीही आपली खात्री पटेल. सभोवतालच्या आवरणाहून आत्मा किती तरी अधिक श्रेष्ठ आणि शक्तिमान् आहे असे आपल्या प्रत्ययास येईल. आत्म्याभोंवतालचें आवरण विलक्षण शक्तिमान् आहे असें आज आपणास वाटत आहे, पण आत्म्याच्या सामर्थ्याच्या मानानें या आवरणाचे सामर्थ्य शून्यप्राय आहे असें त्या वेळी आपणास कळेल. हे सारे घडून येईल की नाही याबद्दल यत्किंचि-