पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] वेदान्त व हक्क. ८३

त्याच्या भोवती जे जंतुदेहाचे जाळे आहे ते त्या पूर्ण रूपाला जंतु या संज्ञेस पात्र करते. या अत्यंत सूक्ष्म रूपापासून तो थेट अत्युच्च अशा मानवी रूपापर्यंत आकारांच्या ज्या अनेक घडामोडी होतात, त्या मूलरूपांत होत नसून त्या केवळ बाह्य आकारात मात्र होत असतात. मूळ जसे आहे तसेंच असते; परंतु त्यावरची आवरणे मात्र बदलत असतात.
 अशी कल्पना करा की, आपणा समोर एक पडदा सोडलेला असून त्याच्या बाहेरच्या बाजूस एक सुंदर देखावा आहे. या पडद्याला एक लहानसें छिद्र असून त्या छिद्राच्या द्वारें बाह्य देखावा आपणांस अंशतः मात्र दिसत आहे. आता हे छिद्र हळुहळु मोठे होत जात आहे अशी कल्पना करा. तें जो जो अधिक मोठे होईल तो तो त्या देखाव्याचा अधिकाधिक मोठा भाग आपल्या दृष्टिपथांत येत जाईल हे उघड आहे. अशा रीतीने तो पडदा अखेरीस सर्वच नाहीसा झाला तर तो सारा बाह्य देखावा एकसमयावच्छेदें आपणांस दिसेल. या दृष्टांतांत सांगितलेला बाह्य देखावा म्हणजे आत्मरूप, आणि आम्ही व हे रूप या दोहोंच्यामध्ये काल, देश आणि कारण या उपाधीचा म्हणजे मायेचा पडदा आहे. या उपाधिरूप पडद्याला कोठे तरी एखादें छिद्र असते आणि त्याच्या द्वारे आत्मरूपाचा एखादा किरण मला दिसत असतो. हे छिद्र अधिक मोठे झाले म्हणजे या आत्मरूपाचा अधिकाधिक मोठा भाग मला दिसू लागतो; आणि अखेरीस हा मायेचा पडदा समूळ नष्ट झाला म्हणजे तें आत्मरूप मीच आहे अशी माझी खात्री होते. या विश्वांत अनेक प्रकारच्या घडामोडी प्रत्यहीं-प्रतिक्षणी-चालू आहेत. पण या घडामोडींचा संबंध आत्मरूपाशी-केवल रूपाशी-मात्र नाही. कोणत्याही प्रकारच्या घडामोडीचा उपसर्ग त्याला लागू शकतच नाही. या घडामोडी बाह्य सृष्टीतल्या आहेत. प्रकृतीची उत्क्रांति प्रत्येक क्षणी होत असते आणि अखेरीस तें केवलरूप स्पष्टत्वास आल्यासारखे दिसू लागते. या केवलरूपाचे अस्तित्व प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. कोणाच्या ठिकाणी या अस्तित्वाचा प्रत्यय कमी प्रमाणाने दिसत असतो तर दुसऱ्या एखाद्याच्या ठिकाणी तो अधिक प्रमाणावर असतो; आणि अशा प्रकारच्या कमीअधिकपणामुळे व्यक्तीव्यक्तीत लहानथोरपणा दिसू लागतो. वास्तविक पाहतां लहान आणि थोर असा भेद विश्वांत नसून ते एकरूपच आहे. केवळ आत्मरूपाच्या दृष्टीने